

Ahilyanagar crime news : अहिल्यानगर शहरातील गुन्हेगारी विश्वात मोठी खळबळ उडवणारी धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्यातील कुख्यात आंदेकर टोळीशी संबंधित चार गुंडांच्या मदतीने सावेडीतील उद्योजक चिरंजीव गाढवे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना संशय आहे.
या प्रकरणामुळे पुण्यातील टोळ्यांचे जाळे थेट अहिल्यानगरपर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट होत असून, शहराच्या कायदा-सुव्यवस्थेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
या प्रकरणात मुश्ताक इब्राहिम शेख, विराट मेहेंदळे उर्फ विल्यम, समर्थ बाबासाहेब मांडळकर आणि समर्थ राजेंद्र दुधभाते (सर्व रा. पुणे) यांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, अटक केलेले सर्व आरोपी पुण्यातील (Pune) आंदेकर टोळीशी संबंधित असून त्यांचे वय अवघे 19 वर्षांच्या आसपास असल्याची माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे.
रविवारी (24 मे) सकाळी सावेडी उपनगरातील पाइपलाइन रोड परिसरात उद्योजक चिरंजीव गाढवे यांच्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला होता. या घटनेदरम्यान गोळीबार झाल्याचाही संशय व्यक्त करण्यात आला होता. घटनास्थळावरून पोलिसांना (Police) रिकामे काडतूस सापडल्याने तपासाला अधिक वेग आला. प्राथमिक तपासात आकाश पवार (रा. सावेडी) याने जुन्या वैमनस्यातून हा हल्ला घडवून आणल्याचे समोर येत आहे. गाढवे यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिरंजीव गाढवे यांच्यावर हा पहिलाच हल्ला नव्हता. यापूर्वी 17 मे रोजीदेखील त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्या घटनेनंतर त्यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद देत दोघांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आरोपींकडून सतत धमक्या मिळत असल्याने गाढवे यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा शहरात रंगली आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अतिरिक्त पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि शहर उपअधीक्षक डॉ. दिलीप टिपरे यांनी तपासाला गती दिली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या पथकाने समांतर तपास सुरू करत मोठी कारवाई केली.
उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, उपनिरीक्षक सालगुडे, पोलिस कर्मचारी संदीप मुरकुटे, गणेश धोत्रे, शाहीर शेख आणि सुनील पवार यांच्या पथकाने भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मिरावली पहाड परिसरात सापळा रचला. दरोड्याच्या तयारीत असलेल्या चार संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि चौकशीत ते आंदेकर टोळीशी संबंधित असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, मुख्य सूत्रधार आकाश पवार कारवाईवेळी पसार झाला होता. परंतु त्यालाही पुढे शिताफीने ताब्यात घेतले. या टोळीतील आणखी एक जण पसार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
अटक केलेल्या आकाश पवार याच्याकडून तीन गावठी पिस्तूल जप्त केले आहे. आता या गुन्ह्यात एकूण चार गावठी पिस्तूल, 12 ते 15 जिवंत काडतुसे आणि एक कोयता, एक बटण चाकू जप्त करण्यात आले आहेत. आंदेकर टोळीतील अटक केलेल्या चौघांपैकी तिघांवर प्रत्येकी सात ते नऊ गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. विशेष म्हणजे, गाढवे यांच्यावर हल्ला करताना आंदेकर टोळीतील हे चौघे एकाच दुचाकीवरून आल्याचा पोलिसांना संशय आहे.
यापूर्वीही अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथे झालेल्या सागर मोहोळकरवरील गोळीबार प्रकरणात पुण्यातील नीलेश घायवळ टोळीचा सहभाग उघड झाला होता. 4 मार्च 2026 रोजी मोहोळकर यांच्यावर जवळून गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर उपचारादरम्यान 16 मार्च रोजी पुण्यातील ससून रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. त्या प्रकरणातही स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनीच पुणे कनेक्शन उघड केले होते. आता गाढवे हल्ला प्रकरणात आंदेकर टोळीचे नाव समोर आल्याने पुण्यातील कुख्यात टोळ्या अहिल्यानगरमध्ये सक्रिय झाल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
गेल्या काही महिन्यांत पुण्यातील कुख्यात टोळ्यांचे नेटवर्क अहिल्यानगरमध्ये वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. खंडणी, गोळीबार, कोयता गँग आणि टोळीवादाच्या वाढत्या घटनांमुळे अहिल्यानगर शहरातील उद्योग क्षेत्रात चिंता व्यक्त केली जात आहे. पुण्यातील गुन्हेगारी टोळ्यांचा वाढता हस्तक्षेप रोखणे आणि शहरातील कायदा-सुव्यवस्था कायम राखणे हे आगामी काळात अहिल्यानगर पोलिसांसमोरचे सर्वात मोठे आव्हान ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.