Bajrang Sonawane sarkarnama
मराठवाडा

Beed: अजितदादांनी तयार केलेला वचक संपला; सुसंस्कृत बीड जिल्हा पुन्हा गुन्हेगारीच्या ट्रॅकवर : बजरंगबाप्पांनी व्यक्त केली चिंता

Beed Crime, Bajrang Sonawane, Tohid Khan Murder: तोहीद खान हत्या प्रकरणानंतर खासदार बजरंग सोनवणे यांनी बीडमधील वाढत्या गुन्हेगारीबाबत चिंता व्यक्त केली. पोलिसांचा वचक कमी झाल्याने जिल्हा गुन्हेगारीचे केंद्र बनत असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली.

सरकारनामा ब्यूरो, Jagdish Pansare

Beed News: अजित पवार यांच्याकडे पालकमंत्रिपदाची धुरा असताना मागील वर्षभरात बीड जिल्हा विकासाच्या ट्रॅकवर येतोय, असे दिलासा देणारे चित्र निर्माण झाले होते. परंतु दुर्दैवाने या जिल्ह्यात पुन्हा गुन्हेगारी वाढली आहे. पोलीसांचा धाक आणि वचक गुन्हेगारांवर राहिला नाही. कधी काळी सु्संस्कृत जिल्हा म्हणून ओळख असलेल्या बीडची ओळख गुन्हेगारीचे हब म्हणून होते की काय? अशी परिस्थिती निर्माण झाल्याची भीती बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केली.

परळी येथील मुस्लिम तरूण तोहीद खान याची ३१ मे रोजी त्याच्याच दोन मित्रांनी डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केली होती. पैशाच्या वादातून झालेल्या या हत्येला आत्महत्या ठरवण्याचा प्रयत्नही आरोपींना केला. पण भटक्या कुत्र्यांमुळे हा खूनाचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलीसांनी दोन आरोपींना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

या हत्या प्रकरणाला राजकीय रंग देवू नका, असे आवाहन परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी दोन दिवसांपूर्वी केले होते. सर्वच पक्षाचे आमदार, खासदार हे तोहीद खान याच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी परळीत येत आहेत. काँग्रेसचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी, आमदार धनंजय मुंडे, करूणा मुंडे, खासदार बजरंग सोनवणे, सुरेश धस यांच्यासह अनेकांनी तोहीद खान कुटुंबियांची भेट घेत आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी करत पिडीत कुटुंबाला न्याय देण्याची भूमिका घेतली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी नुकतीच तोहीद खान कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. भेटीनंतर माध्यमांशी बोलताना बीड जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीवर भाष्य करताना त्यांनी चिंता व्यक्त केली. बीड जिल्ह्याची घडी विस्कटली आहे. पोलीसांचा कोणाला धाक राहिलेला नाही, वचक नाही त्यामुळे गुन्हेगार मोकाट सुटल्याचे चित्र आहे.

वर्षभरापूर्वी बीड जिल्हा पुर्वपदावर येतोय, असे आशादायक चित्र निर्माण झाले होते. दुर्दैवाने ते आता राहीले नाही, अशी खंत बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केली. वाढत्या गुन्हेगारी कारवाया, हत्येच्या घटना यामुळे बीड जिल्हा हा गुन्हेगारीचे हब होऊ पाहत असल्याची उद्विग्न भावना त्यांनी व्यक्त केली. गुन्हेगारांना जिल्ह्यातील काही राजकीय नेत्यांकडून मिळणारे पाठबळ हे त्यामागचे खरे कारण असल्याचे बजरंग सोनवणे यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT