Touhid Khan Murder Case: परळी येथील मुस्लिम तरुण तौहिद खान याची त्याच्या मित्रांकडूनच निघृण हत्या करण्यात आली. दारूची पार्टी केल्यानंतर पैशाच्या वादातून मित्रांनीच त्याच्या डोक्यात दगड घालून त्याला ठार मारले. नंतर आत्महत्या असल्याचा बनाव रचण्यासाठी त्याचा मृतदेह रेल्वे रुळाजवळ टाकला. मात्र मोकाट कुत्र्यांमुळे या खुनाचा सुगावा पोलिसांना लागला. या घटनेनंतर आता बीड जिल्ह्यातील सामाजिक वातावरण पुन्हा एकदा गढूळ झाल्याचे चित्र आहे.
तौहिद खान याच्या खुनानंतर मुस्लिम संघटनांकडून देशात मुस्लिमांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत असल्याचे आरोप केले जात आहेत. काँग्रेसचे माजी आमदार तथा परभणीचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांनी आज परळीत खान कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले. घटनेबद्दल संताप व्यक्त करताना बाबाजानी दुर्राणी म्हणाले की, "मुस्लिमांसाठी स्वतंत्र सुरक्षा कायदा तयार केला जावा, अशी मागणी केली. दलित समाजावर अन्याय झाला तर त्यांच्यासाठी ॲट्रॉसिटी कायदा आहे. त्याच धर्तीवर आता मुस्लिमांसाठी सुरक्षा कायद्याची आवश्यकता भासू लागली आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात जातीय तेढ आणि त्यातून विशिष्ट समाजाला लक्ष करण्याचे प्रकार सुरू आहेत. देशभरात मुस्लिमांची ७७ हजार घरे पाडण्यात आली आहेत. त्यामुळे तीन लाखाहून अधिक मुस्लिम बेघर झाले आहेत."
मॉब लिंचिंग सारखे प्रकार अनेक भागात होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे अशा प्रकारांना सत्ताधारी भाजपच्या नेत्यांकडून प्रोत्साहन दिले जाते, असा आरोप बाबाजानी दुर्राणी यांनी केला आहे. महाराष्ट्रात मुस्लिम धार्मिक स्थळे, दर्गा यांच्यावर सर्रास अतिक्रमणाच्या नावाखाली बुलडोझर फिरवले जात असल्याचंही ते म्हणाले.
मुस्लिम धर्मियांचे धार्मिक स्वातंत्र्य यामुळे धोक्यात आले असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात वाढत असलेल्या धार्मिक, जातीय तणावावर अंकुश ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही दुर्राणी यांनी यावेळी केली. तौहीद खान याच्या हत्या प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा कशी होईल या दृष्टीने दोषारोप पत्र दाखल करून खटला जलद गतीने चालवावा, अशी मागणी ही दुर्राणी यांनी केली आहे.
काय आहे प्रकरण?
३१ मे २०२६, शनिवारी रात्री ८ वाजता अबजल उर्फ तौहीद खान कैरातीखान पठाण, वय ३६, रा. सरदार कॉलनी, राहणार परळी हा त्याचे दोन मित्र ऋषिकेश परमेश्वर फड, गौरव दीपक व्यास यांच्यासोबत परळी तालुक्यातील वरवटी शिवारात गेला होता. दुपारी आणि रात्री त्यांनी दारू पार्टी केली.
पार्टीदरम्यान पैशांच्या देवाणघेवाणीवरून तिघांमध्ये जोरदार वाद झाला. वाद चिघळल्यावर नशेत असलेल्या ऋषिकेश आणि गौरव यांनी बाजूला पडलेला मोठा दगड उचलून तौहिदच्या डोक्यात मारला. बेशुद्ध पडल्यावरही त्याला बेदम मारहाण केली, ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी मध्यरात्री 1:30 वाजता मृतदेह कारमध्ये टाकून लेंडेवाडी शिवारातील रेल्वे पटरीवर नेऊन ठेवला. तौहिदने आत्महत्या केली असा बनाव रचण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पण परिसरातील मोकाट कुत्र्यांनी मृतदेह ओढून रुळाबाहेर आणल्याने त्यांचा कट फसला.
१ जून २०२६ सकाळी 9:30 वाजता लेंडेवाडी शिवारातील रेल्वे रुळावर रक्ताने माखलेला मृतदेह स्थानिकांना आढळला. स्थानिक गुन्हे शाखेने सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल रेकॉर्ड आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोध घेतला. सध्या दोन्ही आरोपी पोलिस कोठडीत आहेत. दोषारोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. घटनेनंतर परळीत तणावाचे वातावरण होते पण पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. ऋषिकेश फड आणि गौरव व्यास या दोघांविरुद्ध परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.