Beed Jail News : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडसह इतर काही कैद्यांना जेलमध्ये व्हिआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याचा मुद्दा राज्यभर गाजला. यातून कारागृह अधीक्षकांची बदली, जेलमधील कामकाजाची उच्चस्तरीय चौकशीचा ससेमिरा तुरुंग प्रशासनाच्या मागे लागला होता.
अखेर बीड जिल्हा कारागृहातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर काही कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्यासह अनेक राजकीय नेते, लोकप्रतिनिधींनी वाल्मिक कराड व त्याच्या साथीदारांना तुरुंगात व्हिआयपी ट्रिटमेंट दिली जात असल्याचा मुद्दा लावून धरला होता.
थेट गृहमंत्री तथा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत तक्रारी करण्यात आल्या होत्या. वाल्मिक कराडला नागपूरच्या कारागृहात हलवा, अशी मागणी देखील करण्यात आली होती. कराड व तुरुंगातील त्याच्या इतर साथीदारांना व्हिआयपी ट्रिटमेंट, मोबाईल वापरण्याची मुभा यासह इतर गंभीर आरोप करण्यात आले होते. परंतु कारागृह प्रशासनाने ते फेटाळले होते. परंतु याची उच्चस्तरीय चौकशी सुरू करण्यात आली होती.
सरपंच संतोष देशमुख हत्या व खंडणी प्रकरणातील मोक्का आरोपी वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीला मिळणारी अवाजवी व्हीआयपी ट्रीटमेंट, क्षमतेपेक्षा जास्त कैदी अन् गेल्या काही महिन्यांत तुरुंगात घडलेले गँगवॉर यामुळे बीड जिल्हा कारागृह चर्चेत आले होते. आता याच तुरुगांतील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तर काही कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
बीड जिल्हा कारागृहात मोक्काचा मुख्य आरोपी वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांना नियमबाह्य सवलती, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, फोन कॉल सुविधा आणि विशेष वागणूक दिली जात असल्याच्या गंभीर तक्रारी दाखल झाल्या होत्या. या संदर्भात कारागृह महानिरीक्षक कार्यालयाकडे पुराव्यासह लेखी तक्रार दाखल करण्यात आली होती.
पोलिस कर्मचारी ढाकणे याने नेमून दिलेल्या कर्तव्याच्या ठिकाणी न थांबता इतरत्र फिरणे आणि कामात हलगर्जीपणा आणि मुंडे नावाच्या कर्मचाऱ्याने ज्युडिशियल कार्यालयातील महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण न करता कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत या दोन कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.