Bajrang Sonawane  Sarkarnama
मराठवाडा

Beed Lok Sabha News : जावयाचा पराभव करणाऱ्या सोनवणेंच्या विजयासाठी राजेसाहेबांनी केले जिवाचे रान !

MP. Bajrang Sonawane Vs Pankaja Munde : पंकजा मुंडे यांच्या बाजूने मंत्री, खासदार, पाच आमदार आणि तेवढेच माजी आमदार अशी फौज होती. तर, बजरंग सोनवणे यांच्या बाजूने खासदार रजनी पाटील, आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे नेते होते..

Datta Deshmukh

Beed News : राजकारणात कोणीच कोणाचा कायचा शत्रु वा मित्र नसतो अशी म्हण नाही तर वास्तव आहे. त्याचाच प्रत्यय बीड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत आला. अटीतटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा पराभव केला. परळी मतदार संघात बजरंग सोनवणे यांच्यासाठी झोकून देणाऱ्या राजेसाहेब देशमुख यांचे जावई ऋषीकेश आडसकर यांचा सोनवणेंनी पराभव केला होता.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बजरंग सोनवणे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सोनवणेंवर विश्वास टाकत त्यांना बीड लोकसभेची उमेदवारी दिली. पंकजा मुंडे (Pankaja Munde) व बजरंग सोनवणे यांच्यात लढत ठरली. पंकजा मुंडे यांच्या बाजूने मंत्री, खासदार, पाच आमदार आणि तेवढेच माजी आमदार व इतर तगडे नेते अशी फौज होती. तर, बजरंग सोनवणे यांच्या बाजूने खासदार रजनी पाटील, आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह दुसऱ्या फळीतील इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे नेते होते. यामध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्ष व रजनी पाटील यांचे कट्टर समर्थक राजेसाहेब देशमुख यांचाही समावेश होता.

देशमुख यांनी परळी मतदार संघात बजरंग सोनवणे यांची प्रचाराची धुरा सांभाळली. या मतदार संघात सोनवणेंपेक्षा पंकजा मुंडे यांना मोठे मताधिक्य मिळाले. हा मतदारसंघ पालकमंत्री धनंजय मुंडे व उमेदवार पंकजा मुंडे यांचे होमपिच असल्याने या मतदार संघात बजरंग सोनवणे यांना यंत्रणा उभारणे कठीण गेले. मात्र, आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांनी आणि काँग्रेस (Congress) जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी जिवाचे रान केले. या निवडणुकीत परळीतील पंकजा मुंडेंची धुरा पालकमंत्री धंनजय मुंडे यांच्या खांद्यावर होती. त्यामुळे मुंडे विरुद्ध सोनवणे या सामन्यात राजेसाहेब देशमुख सुरुवातीपासून सोनवणेंच्या बाजूने उभे होते. कारण भविष्यात त्यांना मुंडेंच्या विरोधातच लढायचे आहे. अखेर सोनवणे साडेसहा हजार मतांच्या फरकाने विजयी झाले आणि तगड्या नेत्या पंकजा मुंडेंचा पराभव झाला.

याच बजरंग सोनवणेंनी 2017 च्या जिल्हा परिषद निवडणुकीत ऋषीकेश आडसकर यांचा पराभव केला होता. ऋषीकेश आडसकर हे राजेसाहेब देशमुख यांचे जावई आहेत. त्याच जिल्हा परिषद निवडणुकीत राजेसाहेब देशमुख काँग्रेसकडून विजयी झाले होते. त्यांना जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापतीपद मिळाले होते. त्यानंतर झालेल्या 2019 च्या निवडणुकीत बजरंग सोनवणे डॉ. प्रीतम मुंडेंच्या विरोधात पराभूत झाले. परंतू त्यानंतर जिल्हा परिषदेत सत्तांतर होऊन बजरंग सोनवणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व शिक्षण व आरोग्य विभागाचे सभापती झाले होते.

दरम्यान, दोन वर्षांपूर्वी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्षपद मिळालेले राजेसाहेब देशमुख परळी मतदार संघातून तयारी करत आहेत. त्यामुळे भविष्यातल्या बांधणीसाठी राजेसाहेब देशमुख यांना सतर्क राहणे आणि सोनवणेंसाठी काम करणे दोन्ही महत्वाचे होते. निकालावेळी आणि त्यानंतर सोनवणे मनोज जरांगे यांच्या भेटीला गेल्यानंतरही राजेसाहेब देशमुख सोबतच होते. आता काही महिन्यांनी होणाऱ्या निवडणुकीत सोनवणे देशमुखांची किती व कशी पाठराखण करतात हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.

(Edited by : Chaitanya Machale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT