Bajrang Sonwane Sarkarnama
मराठवाडा

Beed Lok Sabha Election 2024 : बजरंग सोनवणेंनी सोडली दादांची साथ..., काकांचा धरणार हात

Dattatrya Deshmukh

Beed Lok Sabha News : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक अनपेक्षित घडामोडी घडत आहेत. कधी कोणता नेता कोणत्या पक्षात प्रवेश करेल हे सांगणं कठीण झालं आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून, आज ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) गटात प्रवेश करणार आहेत. बजरंग सोनवणे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) व पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. मागच्या वेळी त्यांनी भाजपच्या डॉ. प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढविली होती.

केज तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून राजकीय ताकद असलेले बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) यांचे 2 साखर कारखाने आहेत. सुरुवातीला केज तालुक्यातील येडेश्वरी कारखाना यशस्वीपणे चालविल्यानंतर सोनवणे यांनी बार्शी (जि. सोलापूर) भागात दुसरा कारखाना घेतला. सोनवणे यांची जिल्ह्यातील राजकीय ताकद, संघटन कौशल्य आणि मतदारसंघावरील पकड यामुळे त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन टर्म जिल्हाध्यक्षपद दिले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मागील लोकसभा निवडणुकीत सोनवणे यांनी डॉ. प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) निवडणूक लढविली होती. या पराभवानंतर सोनवणे यांना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद देण्यात आले. परंतु, राज्यात महाविकास आघाडीचे (MVA) सरकार आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) व पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक मानल्या जाणाऱ्या बजरंग सोनवणे यांचे जिल्हाध्यक्षपद काढल्यानंतर ते काहीसे नाराज होते.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सोनवणे हे अजितदादांच्या गटात सहभागी झाले. परंतु, पुढेही त्यांची नाराजी कायम होती. मागचे काही महिने ते पक्षाच्या सर्व कार्यक्रमांपासून अलिप्त होते. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) पालकमंत्री असूनही ते सत्तेच्या प्रवाहापासून दूर होते.

अशातच सोनवणे हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढविणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या, बीड लोकसभेसाठी शिवसंग्रामच्या डॉ. ज्योती मेटे यांचे नाव पुढे आले आहे. डॉ. मेटे यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली असली तरीदेखील सोनवणे यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील प्रवेशही निश्चित झाला असून, आज दुपारी पुणे येथे ते त्यांच्या समर्थकांसह शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

(Edited By Jagdish Patil)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT