Sandip Kshirsagar | Bajrang Sonwane |Jaydatta Kshirsagar
Sandip Kshirsagar | Bajrang Sonwane |Jaydatta Kshirsagar  Sarkaranama
मराठवाडा

Bajrang Sonwane : राष्ट्रवादीला लोकसभेत दुसऱ्यांदा गुलाल लागण्याला क्षीरसागरच ठरले 'कारण'

दत्ता देशमुख

Beed News, 7 June : राष्ट्रवादीला लोकसभेत दुसऱ्यांदा झेंडा फडकविता आला. 2004 साली भाजपमधून आलेले जयसिंगराव गायकवाड खासदार झाले होते. तर, आता 20 वर्षांनी बजरंग सोनवणेंनी मतदारसंघावर झेंडा फडकविला. योगायोगाने दोन्ही वेळेच्या विजयाला क्षीरसागरच निमित्त ठरले आहेत.

1996 च्या लोकसभा निवडणुकीत सर्वप्रथम भाजपला बीड लोकसभेची जागा जिंकता आली. त्यावेळी पक्षाने काँग्रेसच्या रजनी पाटील यांना मैदानात उतरविले होते. पुढच्या 1998 व 1999 साली झालेल्या निवडणुकीत भाजपचे जयसिंगराव गायकवाड विजयी झाले.

राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना 1999 साली झाली. या निवडणुकीत पक्षाचे राधाकृष्ण होके-पाटील यांचा पराभव झाला. पुढच्या निवडणुकीत भाजपमधून बाहेर पडून राष्ट्रवादीत आलेल्या जयसिंग गायकवाड यांना पक्षाने उमेदवारी दिली. त्यावेळी भाजपकडून प्रकाश सोळंके उमेदवार होते.

तर, राज्यात आघाडी सरकारमध्ये जयदत्त क्षीरसागर व दिवंगत लोकनेत्या डॉ. विमल मुंदडा मंत्री होत्या. जयदत्त क्षीरसागर यांनी ‘तन - मन’ आणि अगदी ‘धन’ ओतून निवडणुक अंगावर घेतली आणि पक्षाचे उमेदवार जयसिंगरावांना लोकसभेत पाठविले.

त्यानंतर पक्ष जिल्ह्यात राजकीय ताकदवान असला तरी पक्षाला विजय मिळविता आला नाही. मागच्या काळात पक्षच फुटला. मात्र, गेल्यावेळी मोठ्या फरकाने पराभूत झालेल्या बजरंग सोनवणे (Bajrang Sonwane) यांनी अशा प्रतिकुल राजकीय परिस्थितीतही धाडसाने उमेदवारीची गदा खांद्यावर घेतली. त्यांना बीड विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक 62 हजारांहून अधिक मतांची लीड मिळाली. त्यामुळे बजरंग सोनवणेंच्या विजयाची वाट मोकळी झाली.

मुंडेंच्या बाजुने दिग्गज नेत्यांची फौज होती. यामध्ये एका मंत्र्यासह एक खासदार, पाच आमदार आणि अर्धा डझन माजी आमदार होते. तर, बजरंग सोनवणेंकडे संदीप क्षीरसागर आमदार व रजनी पाटील खासदार यांच्यासह काही माजी आमदार होते. बीडमध्ये क्षीरसागरांसह इतरही नेत्यांनी ताकद लावली होती. पण, सर्वांच्या केंद्रस्थानी संदीप क्षीरसागर होते.

दरम्यान, निवडणुकीत शेवटच्या टप्प्यापर्यंत तटस्थ असलेल्या माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनीही शेवटच्या दोन दिवसांत आपली यंत्रणा बजरंग सोनवणेंच्या 'तुतारी'च्या मागे लावली. त्याचा फायदा शहरासह वडवणी, नांदूरघाट, माजलगाव यासह जिल्ह्यातील इतर भागांतही झाला. केवळ दोन्ही क्षीरसागरांमुळेच मताधिक्य मिळाले असे नाही. पण, या मताधिक्याला आणि विजयावेळी क्षीरसागरांनी ताकद लावली हेही नाकारता येणार नाही.

( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT