Beed Lok Sabha Result 2024 : ‘उघडा डोळे, बघा नीट’; बीडच्या निकालाने मुंडे भावंडांना मेसेज

Pankaja Munde Vs Bajrang Sonwane : पालकमंत्री भाऊ, पाच आमदार, एक खासदार आणि इतरही तगडे नेते. पंतप्रधान मोदी, उदयनराजेंसह इतर नेत्यांच्या सभा. तरीही बजरंग सोनवणेंनी पंकजा मुंडेंचा पराभव केलाच.
dhananjay munde | pritam munde | pankaja munde | bajrang sonwane
dhananjay munde | pritam munde | pankaja munde | bajrang sonwanesarkarnama
Published on
Updated on

Beed Election Result News : ‘मुंडे’ नामही काफी, अशी राजकीय स्थिती. त्यात महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आल्याने अगोदर तर परिस्थिती एकदम एकतर्फी. त्यात डॉ. प्रितम मुंडे ऐवजी पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळाल्याने त्या तर अधिक ताकदवान.

सोबतीला पालकमंत्री भाऊ, पाच आमदार, एक खासदार आणि इतरही तगडे नेते. पंतप्रधान मोदी, उदयनराजेंसह इतर नेत्यांच्या सभा. तरीही बजरंग सोनवणेंनी पंकजा मुंडेंचा पराभव केलाच.

पराभव पंकजा मुंडेंचा झाला असला तरी निवडणुकीतून जिल्हावासियांनी तिनही मुंडे भावंडांना ‘उघडा डोळे, जिल्ह्याकडे बघा नीट’ असाच संदेश दिला आहे. योग्य वेळ आणि राजकीय धाडसामुळे बजरंग सोनवणेंना संसदेत पोचले.

10 वर्षे केंद्र व राज्यात सत्ता आणि आलटून - पलटून भावंडे सत्तेत व पालकमंत्री. खासदारही बहिणच. सत्तेच्या काळात जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल, असा एकही प्रकल्प कार्यान्वित नाही. नगर - बीड - परळी लोहमार्गाचेही भिजत घोंगडे. अगदी परळीला पंचतारांकित औद्योगिक वसाहत अगोदर मुंडे भावंडांच्या ‘श्रेया’त आणि आता कागदावर आहे.

नवे कारखाने उभारण्याऐवजी वैद्यनाथ कर्जामुळे बंद आणि चालवायला घेतलेला 'अंबा'ही बंदच. डिपीसी, 25/15 हेड, जलयुक्त शिवार किंवा जलजीवनच्या निधीचे गुणगाण असते. मात्र, यातून ठोस विकास किती आणि ठेकेदार कार्यकर्त्यांचे खिसे किती भरले याची चिकीत्सा व्हावी. सौर पथदिवे किती दिवस टिकतात.

दिवंगत गोपीनाथराव मुंडेंचा वारसा चालविणाऱ्या पंकजा मुंडे मतांवर ठाम आणि राजकीयदृष्ट्या धाडसीही. म्हणूनच त्यांनी कधीही पक्षांतर्गत विरोधकांसमोर हात टेकले नाहीत. परंतु, अपयशाचे चिंतन वा यंत्रणेतील उणिवांचाही त्यांनी कधी शोध घेतला नाही. म्हणून खुद्द ग्रामविकास मंत्री असताना जिल्ह्यात 60 पैकी केवळ 19 झेडपी सदस्य निवडून आले तरी त्यांना तो पराभव वाटला नाही.

नगर पालिका, नगर पंचायती, पंचायत समित्यांमध्येही तिच गत झाली. पंकजा मुंडे मंत्री असताना परळी मतदारसंघातील सर्व जिल्हा परिषद गट आणि एक वगळता सर्व पंचायत समित्या राष्ट्रवादीने जिंकल्या. तीच परिस्थिती परळी नगर पंचायत आणि परळी बाजार समितीमध्ये पंकजा मुंडेंच्या नेतृत्वाखालील भाजपची झाली. पण, तरीही असे का झाले याचे चिंतन झाले नाही आणि त्यावर काही केले नाही.

लोकांत राबता असणाऱ्या नेत्यांऐवजी जोरखसपणे घोषणा देणाऱ्यांचाच कायम कोंढाळा राहिला तो अगदी कालच्या लोकसभा निवडणुकीपर्यंय. तेच खासदार डॉ. प्रितम मुंडेंच्या बाबतीत झाले. समर्थकांनी त्यांना 'दबंग' खासदार अशी उपाशी लावली. पण, त्यांनी स्वत:चा संपूर्ण खासदार निधीही खर्च केला नाही हे उघड झाले. प्रशासकीय मान्यतांना त्यांनी निधी खर्च केल्याचे जोरखासपणे सांगितले एवढेच.

2019 च्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर लोकांत जाऊन काम करण्यास आणि समस्या, विकासावर सरकारकडे पाठपुरावा करण्यास पंकजा मुंडेंना मोठा वाव होता. मात्र, त्यांचे जिल्ह्याशी, पक्षाशी आणि सरकारशी ‘अंतर’ वाढल्याचे नाकारता येणार नाही. म्हणूनच पक्षाच्या आमदारांवरील त्यांचे नियंत्रण बऱ्यापैकी सैल झाले.

dhananjay munde | pritam munde | pankaja munde | bajrang sonwane
Beed Lok Sabha Election 2024 : सोळंके, मुंडे, मुंदडा, लक्ष्मण पवारांच्या मतदारसंघातून सोनवणे अन् पंकजाताईंना किती मते?

2014 ते 2019 पर्यंत त्यांच्या नजरेच्या इशाऱ्यावर असलेले आमदार आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे एकनिष्ठ झाले. आता धनंजय मुंडे राज्यात सत्तेत आणि जिल्ह्याचे पालकमंत्री. निधींचे आकडे शेकडो कोटींतच पण उभारले काय तर त्याच त्या जागी पुन्हा कोट्यावधींचे सीसीटीव्ही, डिजीटल फलक, शाळांच्या दुरुस्ती. त्यातून किती विकास साधला जातो हे फक्त कार्यकर्तेच सांगतील.

या कामांच्या याद्याही कशा आणि कोण फायनल करते हेही लपून नाही. कृषी मंत्री म्हणून जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खास काही येण्याऐवजी त्यांच्या हक्काचा पिक विमाच दोन वर्षांपासून मिळाला नाही.

अलिकडे निर्माण झालेले ‘अण्णां’चे स्वतंत्र ‘शक्तीकेंद्र’ शासन - प्रशासनात ‘वाट्टेल’ ते करत असले तरी या शक्तीकेंद्रासमोर महायुतीतील दुसऱ्या फळीतील नेत्यांसह बड्या अधिकाऱ्यांनाही घालावे लागणारे ‘दंडवत’ याचेही परिणाम निवडणुकीत दिसले..

शेतकरी आत्महत्यांत आघाडीवरील जिल्हा मराठा आरक्षणासाठीच्या आत्महत्यांतही पुढे. रोजगारासाठीचे स्थलांतर, शेतीमाल, दुधाला भाव नाही, मराठा आरक्षण आदींमुळे सरकारवर नाराजी होतीच. पण, जिल्ह्यातील कारभार आणि वाढलेले अंतर यामुळे ‘गुड विल’ कमी झाल्याचेही दिसले.

सोनवणेंचे टायमिंग आणि धाडस

महायुतीला कोणी हवे असेल किंवा कोणी विरोधात जात असेल तर ‘ईडी, सीबीआय’चे अस्त्र वापरले जाते. मात्र, दोन कारखाने असूनही बजरंग सोनवणे यांनी सत्तेतून त्यावेळी प्रतिकूल परिस्थिती वाटत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश करण्याचे धाडस केले.

आरक्षणामुळे मराठा, धोरणांमुळे मुस्लिम आणि संविधानावरुन दलित बौद्ध समाजाच्या सरकारवरील नाराजीचा फायदा बजरंग सोनवणेंना झाला. कायम गृहीत धरलेल्या काही घटकांनीही साथ सैल केल्यामुळेच पावणे दोन लाखांनी पराभूत झालेले सोनवणे विजयी झाले.

( Edited By : Akshay Sabale )

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com