Beed Political News : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्यात अटीतटीची झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर आता जिल्ह्यात विधानसभा मतदार संघनिहाय मताधिक्य कोणाला, याचा कथ्याकुट होत आहे.
राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे(Bajrang Sonawane) हे केज मतदार संघातील रहिवाशी असल्याने भाजपने या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या सभा घेतल्या. त्यामुळे आता या मतदार संघातून मताधिक्य कोणाला मिळणार, यावर देखील बीड लोकसभेच्या निकालाचे गणित अवलंबून आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
बीड लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पंकजा मुंडे(Pankaja Munde) व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनवणे यांच्यासह वंचितचे अशोक हिंगे व इतर 38 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहेत. उमेदवार 41असले तरी पंकजा मुंडे व बजरंग सोनवणे यांच्यात थेट लढत झाली. निवडणुकीत भाजपच्या पंकजा मुंडे यांच्यासाठी एक मंत्री, एक खासदार, पाच आमदार आणि 50 हून अधिक माजी जिल्हा परिषद सदस्य अशी नेत्यांची फौज मैदानात होती. तर बजरंग सोनवणे यांची धुरा एका आमदारासह माजी आमदारांवर होती.
दरम्यान, बजरंग सोनवणे हे केज तालुक्यातील रहिवाशी आहेत. केज मतदार संघाचे कार्यक्षेत्र बीड तालुक्याचा काही भाग, अंबाजोगाई तालुका तसेच केज तालुका अशा तीन तालुक्यांत विस्तारलेले आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीत या मतदार संघातून भाजपच्या डॉ. प्रीतम मुंडे यांना आघाडी होती. स्वत:चे होमपिच असूनही बजरंग सोनवणे मागच्या वेळी या मतदार संघातून पिछाडीवर होते.
मागच्या वेळी या मतदार संघाचे प्रतिनिधित्व संगीता ठोंबरे करत होत्या. यावेळी भाजपच्या पंकजा मुंडे यांच्यासाठी भाजप(BJP) आमदार नमिता मुंदडा यांच्यासह त्यांचे पती अक्षय मुंदडा, सासरे नंदकिशोर मुंदडा तसेच भाजपचे माजलगाव मतदार संघातील नेते रमेशराव आडसकर यांनीही केजमध्ये लक्ष घातले होते. बजरंग सोनवणे यांची धुरा माजी आमदार पृथ्वीराज साठे, डॉ. नरेंद्र काळे आदी मंडळी सांभाळत होती.
राष्ट्रवादीच्या उमेदवाराला स्वत:च्याच मतदार संघातून मताधिक्य मिळू नये यासाठी भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा जिल्ह्याचे ठिकाण बीड(Beed) ऐवजी केज मतदार संघातील सर्वाधिक मतदान असलेल्या अंबाजोगाईत घेतली. त्यानंतर शेवटच्या टप्प्यात खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांचीही सभा केज तालुक्यातील युसूफवडगावला घेतली. त्यामुळे आता या मतदार संघातून भाजपच्या पंकजा मुंडे यांना मताधिक्य मिळणार की राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे यांना मिळणार? हे पाहणे महत्वाचे आहे.
या मतदार संघातील मताधिक्यावर आता लोकसभेचे गणित मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. बीड लोकसभा मतदार संघ हा 11 तालुक्यांचा आणि सहा विधानसभा मतदार संघाचा आहे. यात बीड, माजलगाव व गेवराईतून राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे यांना मताधिक्य मिळेल, असे मानले जाते. तर, परळी व आष्टीतून भाजपच्या पंकजा मुंडेंना मिळेल, असे गणित मांडले जाते. आता बजरंग सोनवणेंच्या केजमधून त्यांना मताधिक्य मिळणार का मोदी, उदयनराजेंच्या सभांमुळे भाजप आघाडी घेणार हे पाहणे महत्वाचे आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.