MP Bajrang Sonwane & Family Sarkarnama
मराठवाडा

MP Bajrang Sonwane : बजरंग बाप्पांना बालाजी पावला, सहकुटुंब जाऊन घेतले दर्शन...

Jagdish Pansare

Beed, 07 July : नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या बीड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनवणे हे विजयी झाले. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा त्यांनी साडेसहा हजार मतांनी पराभव केला. बजरंग सोनवणे यांचा शनिवारी (ता. 6 जुलै) वाढदिवस होता. पण यावर्षीचा वाढदिवस त्यांच्यासाठी खास ठरला, कारण बीडकरांनी त्यांना खासदार म्हणून दिल्लीत निवडून पाठवले आहे.

या विजयाबद्दल देवाचे आभार मानण्यासाठी बजरंग बाप्पा सोनवणे (MP Bajrang Sonwane) यांनी नुकतेच सहकुटुंब तिरुपती बालाजीचे (Tirupati Balaji) दर्शन घेतले. आपल्या इच्छा-आकांक्षा पूर्ण व्हाव्यात; म्हणून प्रत्येकजण देवाला साकडे घालत असतो. बीड लोकसभा मतदारसंघात (Beed Lok Sabha Constituency) अनेक नाट्यमय राजकीय घडामोडी, संघर्षानंतर बजरंग सोनवणे यांनी विजय मिळवला.

या विजयाची चर्चा राज्यभरात झाली, त्यामुळे त्यांच्यासाठी व कुटुंबीयांसाठी हा क्षण महत्वाचा होता. बजरंग सोनवणे यांच्या वाढदिवासानिमित्त त्यांनी सहकुटुंब तिरुपती बालाजी, पद्मावती व श्रीकालहस्ती येथे दर्शन घेऊन भगवंताचे आशीर्वाद घेतले. प्रत्येक वाढदिवस खास असतो. परंतु हा माझा वाढदिवस विशेष आहे.

माझ्या वाढदिवसा आधीच मला बीड जिल्ह्यातील जनतेने खासदारकीचे गिफ्ट दिले आहे. अनेक दिवसांनी परिवारासह देवदर्शन करून आनंद झाल्याची प्रतिक्रिया सोनवणे यांनी व्यक्त केली. बीड लोकसभेची निवडणूक राज्यात गाजण्याचे कारण म्हणजे बजरंग सोनवणे यांनी बीड जिल्ह्यात मुंडे बहिण-भावाच्या वर्चस्वाला हादरा दिला आहे.

मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणावरून राज्यात पेटलेल्या संघर्षाचा खऱ्या अर्थाने स्फोट कुठे झाला तर तो बीड जिल्ह्यात. निवडणुकीत बूथ कॅप्चरिंगपासून मराठा समाजावर बहिष्कार टाकण्यापासूनच्या आरोपाने जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघाले होते. मतमोजणीच्या दिवशी आक्षेप, आरोप-प्रत्यारोप आणि फेरमतमोजणीच्या मागणीने ही निवडणूक गाजली होती.

या सगळ्यावर मात करत बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर विजय मिळवला होता. केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सत्तेवर आलेल्या एनडीए सरकारच्या पहिल्याच अधिवेशनात बजरंग सोनवणे यांनी दिल्लीत सर्व पक्षाच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत संपर्क वाढवण्यावर भर दिल्याचे दिसून आले होते. आता पुढील पाच वर्षे बीड जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी बळ मिळो, असे साकडे बजरंग बाप्पा यांनी बालाजीला घातले आहे.

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT