Bajrang Sonawane at Loksabha News : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये अनेक धक्कादायक निकाल लागले. मिशन 45 साठी मैदानात उतरलेल्या महायुतीला महाविकास आघाडीने लगाम घालत 18 जागांवरच रोखले.
राज्यात सर्वाधिक नुकसान झाले ते भाजपचे, त्यातही मराठवाड्यात या पक्षाचा एकही खासदार निवडून आला नाही. खात्रीने निवडून येतील अशा जागेवर भाजपचे दिग्गज पडले. त्यात महायुतीसाठी सर्वात धक्कादायक पराभव ठरला तो भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग बाप्पा सोनवणे यांनी पंकजा मुंडे(Pankaja Munde) यांचा अटीतटीच्या लढतीत पराभव करत विजय मिळवला. पहिल्यांदाच खासदार झालेले बजरंग सोनवणे संसदेच्या पहिल्याच अधिवेशनात दिग्गज मंत्र्यांसह सत्ताधारी आणि विरोधातील नेत्यांची भेट घेण्यावर भर देताना दिसत आहे.
लोकसभेचे अधिवेशन सुरू झाल्यापासून रोज कुठल्या ना कुठल्या मंत्र्यांची भेट सोनवणे घेत आहेत. मंगळवारी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे देशातील क्रमाकं दोनचे नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमित शाह यांची भेट घेतली. गृहमंत्री पदाचा कार्यभार मिळाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी त्यांच्यासोबत अहमदनगरचे खासदार नीलेश लंके आणि जालना लोकसभेचे खासदार डॉ. कल्याण काळे हे देखील उपस्थित होते.
'खासदार म्हणून पहिल्यांदाच निवडून आल्याबद्दल शाह यांनी माझे अभिनंदन केले, तसेच बीड लोकसभा मतदारसंघाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सकारात्मक भूमिका राहील, अशी ग्वाही दिली.' असं सोनवणे यांनी म्हटले आहे.
गृहमंत्री अमित शाह(Amit Shah) यांची भेट घेतल्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संसद कार्य मंत्री किरेन रिजिजू, वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची बजरंग बाप्पा यांनी भेट घेतली. साखर निर्यात, कांदा निर्यात यासह विविध प्रश्नांवर त्यांच्याशी चर्चा केल्याचे सोनवणे यांनी सांगितले.
देशाचे लोकप्रिय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari) यांची भेट घेऊन बीड जिल्ह्यातील विविध रस्त्यांच्या प्रश्नांसंदर्भात सोनवणे यांनी चर्चा केली. बीड जिल्ह्यातील रस्ते विकासाबाबत प्रश्न घेऊन या, आपले प्रश्न निश्चितपणे सोडवले जातील, असा विश्वास गडकरी यांनी या भेटीत दिल्याचे सोनवणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
मागील दोन दिवसांपासून आपल्या आक्रमक भाषणामधून सत्ताधारी पक्षावर हल्ला चढवणारे लोकसभेती विरोधी पक्षनेते राहुल गांधी(Rahul Gandhi) यांचीही बजरंग सोनवणे यांनी भेट घेतली. 'ज्यांनी लोकसमाज जागृत करून अन्यायाविरुद्ध शंख फुंकला, त्या राहुल गांधी यांची भेट घेऊन आनंद झाला. अत्यंत साध्या आणि सरळ व्यक्तिमत्त्वाचे धनी असलेल्या राहुल गांधी यांनी यावेळी माझे अभिनंदन केले. इंडिया आघाडीच्या माध्यमातून संसदेत आपण सोबत लढू, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.' असं बजरंग सोनवणे यांनी सांगितलं.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.