Beed Municipal Council : बीड नगरपालिकेच्या वादळी ठरलेल्या गेल्या सर्वसाधारण सभेतील ते चित्र अजूनही सगळ्यांच्या नजरेसमोर आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष प्रेमलता पारवे यांनी तावातावाने आपल्याच पक्षाचे उपनगराध्यक्ष विनोद मुळूक यांना ‘खाली जाऊन बसा’, असे म्हणत सुनावले होते. यावर मुळूक यांनीही ‘तुम्ही मला सांगणाऱ्या कोण?’ असा प्रतिआव्हान दिले होते.
सर्वसाधारण सभेतील ही पक्षांतर्गत लढाई आता बीड शहरातील रस्त्यावर सुरू झाली आहे. उपनगराध्यक्ष विनोद मुळूक यांनी नगरपालिकेच्या अगदी समोरच एक बॅनर लावून स्वकीयांनाच निर्वाणीचा सूचक इशारा दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोसह फक्त मुळूक यांचा चेहरा आणि त्यावर ‘डॅशिंग उपनगराध्यक्ष’ असा उल्लेख असलेले बॅनर सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील १९ पैकी ११ नगरसेवकांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. त्याचे नेतृत्व विनोद मुळूक यांच्याकडे तर नाही ना? अशी चर्चा या डॅशिंग बॅनरबाजीनंतर रंगू लागली आहे. सात महिन्यांपूर्वी सत्तेवर आलेल्या नगरपालिकेच्या अगदी पहिल्या सभेपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक आपापसातच भांडत आहेत.
पक्षाच्या नेत्या आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी समजूत घालूनही नगरसेवकांच्या वागण्यात बदल झालेला नाही. गेल्या सर्वसाधारण सभेत झालेल्या गदारोळातून ते दिसून आले आहे. विशेष म्हणजे, या सगळ्या गोंधळावर जिल्ह्यातील तीनही आमदार विजयसिंह पंडित, प्रकाश सोळंके, धनंजय मुंडे, जिल्हाध्यक्ष हे मूग गिळून गप्प आहेत. पक्षाची जाहीरपणे इभ्रत जात असताना नेत्यांचे हे मौन म्हणजे बंडाला प्रोत्साहन ठरत आहे.
बीड नगरपालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी आणि कुरघोडीचे राजकारण याचा आता सामान्यांना वीट आला आहे. शहरातील पाणी, कचरा, आरोग्य, रस्ते हे मूलभूत प्रश्न जैसे थे आहेत. मग सत्ता बदल करून काय मिळवले? असा प्रश्न नागरिक स्वतःलाच विचारू लागले आहेत.
नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष विनोद मुळूक यांचे शहरात झळकलेले बॅनर पक्षातील गटबाजी पुढेही सुरूच राहणार, हेच दर्शवते. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि आमदार विजयसिंह पंडित यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादी काँग्रेसने बीड नगरपालिकेची सत्ता हस्तगत केली होती. उपनगराध्यक्ष पदासाठी पक्षात अनेक प्रबळ दावेदार शर्यतीत असताना आमदार विजयसिंह पंडित यांनी मोठा विश्वास दाखवत विनोद मुळूक यांच्या गळ्यात उपनगराध्यक्ष पदाची माळ घातली होती.
मात्र, अवघ्या सात महिन्यांतच नगरपालिकेत सत्ताधारी राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले. अशातच आता थेट नगरपालिकेसमोरच लागलेल्या या बॅनरवर अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार किंवा आमदार विजयसिंह पंडित यांचा फोटो पूर्णपणे टाळण्यात आला आहे. ज्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आले आणि ज्या नेतृत्वाने उपनगराध्यक्ष पदाची खुर्ची दिली, त्यांनाच बॅनरवरून वगळण्यात आल्याने उपनगराध्यक्षांनी थेट बंडखोरीचेच निशाण फडकावल्याची चर्चा सुरू झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.