नितीन चव्हाण
Beed Politics : बीडच्या राजकीय आखाड्यात कधी काय घडेल, याचा नेम उरलेला नाही, राजकारणात ना कोणी कायमचा शत्रू असतो, ना कोणी कायमचा मित्र... या म्हणीची प्रचिती आता बीड नगरपरिषदेच्या राजकारणात पुन्हा एकदा येताना दिसत आहे. अवघ्या सहा महिन्यांपूर्वी थाटामाटात स्थापन झालेल्या सत्तेसमोर आता राजकीय अस्तित्वाचेच मोठे आव्हान उभे राहिले आहे.
सत्ताधारी नगरसेवकांच्या एका मोठ्या गटानेच नाराजीचा सूर आळवल्याने बीड नगरपरिषदेत ऑपरेशन सत्तांतरच्या जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यातच अनेक वर्षांचे कट्टर राजकीय वैरी मानले जाणारे क्षीरसागर बंधू आता बीडच्या विकासासाठी एकत्र येण्याचे संकेत देत असल्याने आमदार विजयसिंह पंडित यांच्या गोटात मोठी अस्वस्थता पसरली आहे.
तत्कालीन महायुतीच्या जोरावर आणि राष्ट्रवादीचे नेते आमदार विजयसिंह पंडित यांच्या भक्कम नेतृत्वाखाली बीड नगरपरिषदेत सत्ता स्थापन झाली होती. मात्र, अवघ्या सहा महिन्यांच्या आतच नगरपरिषदेच्या अंतर्गत कारभारावरून धुसफूस सुरू झाली. सत्ताधारी पक्षातीलच काही नगरसेवक भयंकर नाराज असून, आमचा ऐकलाच जात नाही, अशी खंत दबक्या आवाजात व्यक्त करत आहेत.
हाच अंतर्गत असंतोष आता उघड्यावर आला असून, बीडच्या सत्तेची इमारत कधीही कोसळू शकते, असा दावा राजकीय विश्लेषक करत आहेत. नगरपरिषदेतील बिघडलेल्या कारभारावर बोट ठेवत भाजपचे नेते योगेश क्षीरसागर यांनी एक मोठा राजकीय विधान करून बीडच्या वर्तुळात भूकंप घडवून आणला आहे. बीडचा विकास पूर्णपणे ठप्प झाला आहे. नगरपरिषदेत सध्या जो काही सावळागोंधळ सुरू आहे, तो थांबवण्यासाठी आणि शहराच्या खऱ्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याची वेळ आली आहे असे ठाम वक्तव्य योगेश क्षीरसागर यांनी केले.
त्यांच्या या विधानामुळे बीडमध्ये क्षीरसागर गट पुन्हा एकवटणार का? अशा चर्चांना उधाण आले आहे. योगेश क्षीरसागर यांच्या या राजकीय गुगलीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनीही अत्यंत सावध पण तितकाच सकारात्मक रिप्लाय दिला आहे.
संदीप क्षीरसागर म्हणाले, बीड शहराचे हित आणि जनतेचा विकास आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे. जर शहराच्या भल्यासाठी तशी वेळ आलीच, तर आम्ही दोन्ही क्षीरसागर भाऊ एकत्र बसून चर्चा करण्यास तयार आहोत. काका-पुतणे आणि क्षीरसागर बंधूंमधील ऐतिहासिक राजकीय वैराचा पट पाहता, या दोन नेत्यांचे हे वक्तव्य बीडच्या राजकारणाला कलाटणी देणारे ठरणार आहे.
योगेश क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर हे दोन्ही गट एकत्र आले, तर बीड नगरपरिषदेचे राजकीय पारडे क्षणात उलटू शकते. नाराज नगरसेवकांचा गट आधीच सत्ताधाऱ्यांवर टपून बसला आहे. अशा परिस्थितीत क्षीरसागर बंधूंची ही संभाव्य युती आमदार विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखालील सत्तेला सरळ-सरळ थेट आव्हान देणारी ठरणार आहे. आपली सत्ता वाचवण्यासाठी आता पंडित गटाला मोठी मोर्चेबांधणी करावी लागणार आहे.
बीडच्या राजकीय गल्लीबोळात सध्या एकाच गोष्टीची चर्चा आहे, नगरपरिषदेत भूकंप कधी होणार? येत्या १५ दिवसांत बीडच्या राजकारणात मोठा राजकीय ड्रामा पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. नाराज नगरसेवक नेमकी काय भूमिका घेतात आणि क्षीरसागर बंधूंची ही 'एकता' प्रत्यक्ष टेबलवर येते का? यावर बीड नगरपरिषदेचे भवितव्य अवलंबून असणार आहे. एकूणच काय, तर बीडच्या सत्तेचा खेळ आता भलताच रंगतदार वळणावर आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.