sandeep kshirsagar, vijaysinh pandit Sarkarnama
मराठवाडा

Beed Politics : बीडमध्ये सत्ता बदलाचे वारे : 'क्षीरसागरांच्या' हालचालींवर पंडित 'सायलेंट'; चव्हाणांची डॅमेज कंट्रोलसाठी धडपड

Beed Municipality Politics : नगरपालिकेतील सत्ताधारी गटातील या पडझडीवर आणि क्षीरसागरांच्या एकत्र येण्याच्या हालचालींवर पंडित यांनी घेतलेली ही शांतता आगामी काळात नव्या राजकीय समीकरणांना जन्म देणार की काय?अशी शंका उपस्थित केली जात आहे.

Jagdish Pansare

नितीन चव्हाण

Beed News, 05 Aug : बीड नगरपालिकेतील सत्ताधारी गटातील अंतर्गत कलह आणि विकासनिधीच्या वाटपावरून झालेला राडा आता जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात भलताच तापला आहे. सत्ताधारी नगरसेवकांमधील या वादाचा फायदा घेत बीडचे आमदार संदीप क्षीरसागर (राष्ट्रवादी शरद पवार) आणि भाजप नेते डॉ.योगेश क्षीरसागर हे दोन्ही पारंपरिक राजकीय विरोधक बीडच्या विकासासाठी एकत्र येण्याच्या आणि नगरपालिकेत सत्तांतराच्या भाषा करू लागले आहेत.

क्षीरसागर युतीच्या उफाळलेल्या चर्चांमुळे बीडच्या राजकारणात मोठ्या घडामोडींचे संकेत मिळत आहेत. सर्वसाधारण सभेदरम्यान नगरसेवक आणि सभापतींमध्ये निधीच्या असमान वाटपावरून आणि रखडलेल्या कामांवरून जोरदार खडाजंगी झाली होती. सत्ताधारी नगरसेवकांमध्ये निर्माण झालेल्या या दुराव्याचा फायदा घेत दोन्ही क्षीरसागर बंधूंनी नगरपालिकेवर पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी हालचाली सुरू केल्याचे बोलले जात आहे.

शहराच्या विकासाचे कारण देत दोन्ही गट एकत्र आल्यास नगरपालिकेत मोठे सत्तांतर घडून येऊ शकते, असा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त होत आहे. एकीकडे क्षीरसागरांच्या या संभाव्य समीकरणांची तुफान चर्चा सुरू असताना, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नेते आमदार विजयसिंह पंडित यांनी मात्र या संपूर्ण प्रकरणावर पूर्णपणे मौन बाळगणे पसंत केले आहे.

नगरपालिकेतील सत्ताधारी गटातील या पडझडीवर आणि क्षीरसागरांच्या एकत्र येण्याच्या हालचालींवर पंडित यांनी घेतलेली ही शांतता आगामी काळात नव्या राजकीय समीकरणांना जन्म देणार की काय?अशी शंका उपस्थित केली जात आहे. दरम्यान, नगरपालिकेतील या अंतर्गत वादामुळे पक्षाची बदनामी रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) जिल्हाध्यक्ष रामेश्वर आबा चव्हाण डॅमेज कंट्रोलसाठी मैदानात उतरले आहेत.

बीड नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये काही नगरसेवक आणि सभापती यांच्यात निधी आणि विकासकामांवरून मतभेद झाले आहेत, हे खरे आहे. मात्र, याबाबत आम्ही आमचे पक्षश्रेष्ठी तसेच स्वतः सुनेत्राताई पवार यांच्या कानावर सर्व बाबी घातल्या आहेत. नगरसेवकांमधील अंतर्गत मतभेद पक्षश्रेष्ठींच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत निश्चितपणे सोडवले जातील, असा विश्वास रामेश्वर चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. ​आता पक्षश्रेष्ठी या वादावर पडदा टाकण्यात यशस्वी ठरतात की क्षीरसागर बंधू बीड नगरपालिकेत सत्तांतर घडवून आणतात? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT