

Mumbai News, 05 Jul : राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर केलेल्या 'गूँगी गुडिया' या उल्लेखावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. काँग्रेसच्या पोस्टवर राष्ट्रवादी काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतल्यानंतर आता स्वतः सुनेत्रा पवार यांनीही या वादावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
१ ऑगस्ट रोजी बीड येथे झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान सुनेत्रा पवार यांच्या शेजारी राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे उपस्थित होते. पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला असता, धनंजय मुंडे यांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला आणि उत्तर न देता तेथून निघून गेले. सुनेत्रा पवार उपस्थित असतानाच घडलेल्या या घटनेची राज्यभर चर्चा झाली.
याच घटनेचा संदर्भ देत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने 'एक्स'वर पोस्ट करत, "सुनेत्रा पवार अजून किती दिवस 'गूँगी गुडिया' बनून राहणार?" असा सवाल उपस्थित केला. या पोस्टवर राष्ट्रवादी काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त करत काँग्रेसने माफी मागावी, अशी मागणी केली.
यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषद घेऊन 'गूँगी गुडिया' हा कोणताही अपमानास्पद शब्द नसून तो त्यांच्या वर्तनाचे वर्णन असल्याचे स्पष्टीकरण दिले. मात्र, या स्पष्टीकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मुंबईतील काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात दाखल झाले आणि जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली. तसेच ठाणे आणि पुणे येथेही राष्ट्रवादी काँग्रेसकडून काँग्रेसविरोधात आंदोलन करण्यात आले.
दरम्यान, या संपूर्ण वादावर सुनेत्रा पवार यांनी प्रथमच भाष्य केले आहे. पत्रकारांनी याबाबत विचारणा केली असता, "वेळ आल्यानंतर चोख उत्तर देईन," अशी संक्षिप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली. सुनेत्रा पवार यांच्या या वक्तव्यानंतर या वादाला आणखी राजकीय रंग चढण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, काँग्रेसच्या टीकेला त्या पुढे कोणत्या पद्धतीने उत्तर देतात, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.