NCP News : बीड जिल्हा आणि त्यात परळी तालुक्यातील वाढती गुन्हेगारी पोलीसांसाठी डोकेदुखी ठरत आहे. महादेव मुंडे, सरपंच बापू आंधळे, तौहीद खान यांच्या हत्या प्रकरणाने परळी व बीड जिल्हा हादरला होता. ही प्रकरणे ताजी असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका नगरसेवकाने आपल्याच कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला करायला लावल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. एवढेच नाही तर 'त्याचे हातपाय तोडा, मुंडके माझ्याकडे आणा' असे फर्मान संबंधित नगरसेवकांनी आपल्या समर्थकांना सोडले होते, असा दावा फिर्यादीने केला आहे.
या प्रकरणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नगरसेवक नितीन रोडे व त्याच्या हल्लेखोर साथीदारांवर गुन्हा दाखल झाला आहे. अश्लील भाषेत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याच्या रागातून हा हल्ला करण्यात आल्याचे सांगितले जाते. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला तरुण कार्यकर्ता अभिजीत कांबळे याने दिलेल्या जबाबात, 'आपले मुंडके घेऊन या' असा आदेश मारहाण करणाऱ्यांना संबंधित नगरसेवकाने दिला होता, असा आरोप केला आहे.
या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार हाच नगरसेवक असल्याचे या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. या घटनेमुळे परळी शहर पुन्हा हादरून गेले आहे. परळी शहरातील भीमनगर भागातील राष्ट्रवादी काँग्रेसचा तरुण कार्यकर्ता अभिजीत नागेश कांबळे (वय 29) यास गेल्या रविवारी (ता.12) शहरातील चांदापूर मार्गावरील पेट्रोल पंपासमोर मारहाण झाली होती. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला होता.
त्याच्यावर परळी उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यास आंबेजोगाईच्या शासकीय रुग्णालयात हलवले होते. या प्रकरणी त्याने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून नगरसेवक नितीन रोडे याच्यासह त्याचे सहकारी आनंद कांबळे, सुरेश चौंडे, रतन आदोडे, संतोष इंदरकर,रोहन साळवे, दत्ता कुरूप आदींसह एकूण दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी अभिजीत कांबळे यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे, की आपल्याला गेल्या रविवारी चांदापूर मार्गावरील पेट्रोल पंपासमोर लोखंडी राॅड व उलट्या कोयत्याने मारहाण झाली. ही मारहाण सुरु असताना हल्लेखोरांच्या फोनवर 'त्याचे मुंडके घेऊन या' अशी सूचना नगरसेवक नितीन रोडे याने केली. दुसऱ्याच्या फोनवरून रोडे याने हल्लोखोरांना सोडलेले हे फर्मान आपण ऐकले असल्याचे अभिजीतने सांगितले आहे.
या भांडणात अभिजीतचे दोन्ही हात व पाय फ्रॅक्चर झाले आहेत. या प्रकरणातील सर्व आरोपी फरारी असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. या घटनेचा कोणताही व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झालेला नाही. फिर्यादीचे मुंडके घेऊन या, असे म्हणणे असलेला व्हिडिओ देखील पोलीस तपासात आतापर्यंत आढळलेला नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, हा संघर्ष वाढदिवसाच्या शुभेच्छा अश्लील भाषेत दिल्याने झाला असल्याची चर्चा आहे. राजकीय वादातून ही घटना घडली असल्याचे काही कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.