Beed Ncp Crisis News  Sarkarnama
मराठवाडा

Beed Ncp Crisis News : सहा आमदार सत्तेत, क्षीरसागर एकमेव विरोधक...

Datta Deshmukh

Marathwada : नऊ दिवसांपूर्वी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत सत्तेत मंत्री म्हणून सहभागी आठ मंत्र्यांमध्ये जिल्ह्यातील धनंजय मुंडे यांचाही समावेश आहे. (Beed Ncp Crisis News) याचा परिणाम जिल्ह्याच्या राजकारणावर मोठ्या प्रमाणावर झाला आहे. राष्ट्रवादीतील दोन गटांतील विभागणीमुळे जिल्ह्यात सत्तेच्या प्रवाहाविरोधात केवळ एक आमदार राहीला आहे. तर, भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा आमदार सत्तेच्या झाडाची फळे तोडून लोकांचे प्रश्न सोडविणार आहेत.

राज्यात विधीमंडळ हे सर्वोच्च सभाभगृह मानले जाते. आमदार म्हणजे विधानसभा मतदार संघातील सर्व लोकांचा व मतदारांचा विधानसभेतील प्रतिनिधी. (NCP) या प्रतिनिधीने त्यांना विजयासाठी मतदान केलेल्यांसह मतदार संघातील सर्वच जनतेच्या हितासाठी सभागृहात व शासन दरबारी पाठपुरावा करावा, असे अभिप्रेत आहे. (BJP) मात्र, बदलत्या काळात `ज्याच्या हाती सत्तेची दोरी तोच समाज उद्धारी`, असे समिकरण झाले आहे. त्यामुळे सत्तेतलीच आमदारकी प्रत्येकाला हवीहवीशी वाटू लागल्याचे चित्र राज्यात निर्माण झाले आहे.

यातूनच गेल्या रविवारी (ता. आठ) भाजप - शिवसेनेच्या सत्तेत उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांची एंट्री झाली. (Beed News) त्यांच्यासोबतच्या इतर आठ आमदारांनाही मंत्रीपद मिळाले. धनंजय मुंडे हे पुन्हा पालकमंत्री होतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे चार आमदार विजयी झाले. यामध्ये परळीतून धनंजय मुंडे, माजलगावमधून प्रकाश सोळंके, बीडमधून संदीप क्षीरसागर व आष्टीतून बाळासाहेब आजबे.

तर, केजमधून नमिता मुंदडा व गेवराईतून लक्ष्मण पवार हे दोन आमदार भाजपकडून विजयी झाले. तत्पुर्वी लातूर-उस्मानाबाद-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून भाजपचे सुरेश धस विजयी झाले होते. त्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यात सात आमदार आहेत. आता नव्या समिकरणात धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळाले असून अजित पवार यांच्या गोटात प्रकाश सोळंके व बाळासाहेब आजबे देखील सहभागी झाले आहेत.

त्यामुळे आता सत्तेसोबत धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंके, बाळासाहेब आजबे तसेच भाजपचे विधान सभेचे लक्ष्मण पवार, नमिता मुंदडा व परिषदेचे सुरेश धस असे सहा आमदार असतील. तर, जेष्ठ नेते शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापैकी संदीप क्षीरसागर यांनी सुरुवातीलाच आपली निष्ठा शरद पवार यांच्याबाजूने असल्याचे जाहीर करुन टाकले. त्यामुळे आता संदीप क्षीरसागर यांना विरोधात बसावे लागणार आहे. म्हणजेच कुठल्याही मंत्र्यांच्या उपस्थितीतील बैठकीत सहा विरुद्ध एक असेच चित्र असणार आहे.

दरम्यान, जिल्हा नियोजन समितीसह जिल्ह्याच्या विकासाबाबतच्या बैठकांसाठी सर्वच आमदार व खासदारांना निमंत्रण असते. यापूर्वी धनंजय मुंडे पालकमंत्री असताना खासदार डॉ. प्रितम मुंडे अनेकदा बैठकींना हजर नसत. पुढे सत्तांतरानंतर अतुल सावे यांच्याकडे पालकमंत्रीपद आल्यानंतर डॉ. मुंडेंनी सुरुवातीला हजेरी लावली. नंतर सावेंनी आपले घोडे दामटण्यास सुरुवात केल्याने पुन्हा मुंडे यांनी सावेंच्या बैठकांकडे पाठ फिरविली. आता धनंजय मुंडे यांच्याकडे पालकमंत्रीपद येणार हे निश्चित मानले जात आहे. पवार यांची एंट्री व मुंडे यांना मंत्रीपद यामुळे जिल्ह्याचे राजकीय समिकरण पुर्णपणे बदलणार आहे. राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रु नसतो किंवा मित्रही नसतो हे वास्तव आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाली आणि जिल्ह्यातील धनंजय मुंडे यांना मंत्रीपद भेटले. त्यावेळी या पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी जाहीर नाराजी व्यक्त करत अगदी राजीनाम्याची भूमिका घेतली होती. नंतर त्यांचे व धनंजय मुंडे यांच्यातील संबंध देखील शेवटपर्यंत ताणलेलेच होते. संदीप क्षीरसागर व धनंजय मुंडे यांच्यातही दुरावा निर्माण झाला होता. नंतर दोघांतील संबंध जुळले. पुढे देवस्थान जमिनींच्या विषयात बाळासाहेब आजबे देखील धनंजय मुंडे यांच्या विरोधात गेले होते. आता नव्या समिकरणात सोळंके व आजबे तर धनंजय मुंडे यांच्यासोबत असतील. तर, भाजपच्या लक्ष्मण पवार व नमिता मुंदडा यांनाही धनंजय मुंडे यांच्यासोबत काम करावे लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT