NCP MLA Prakash Solanke Sindphana Public School News Sarkarnama
मराठवाडा

Beed News: राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराच्या वसतिगृहामधून 10वीचे तीन विद्यार्थी बेपत्ता, पालकांनी पोलीस ठाण्यातच फोडला हंबरडा

NCP MLA Prakash Solanke Sindphana Public School News: बीडच्या माजलगावजवळील सिंदफणा पब्लिक स्कूलच्या वसतिगृहातून दहावीचे तीन विद्यार्थी बेपत्ता झाले आहेत. माजलगाव पोलिसांकडून विद्यार्थ्यांचा शोध सुरू आहे.

Mangesh Mahale

Beed News: दहावीच्या परीक्षेच्या वर्षात शिकणारे तीन विद्यार्थी वसतिगृहातून अचानक बेपत्ता झाल्याने माजलगाव परिसरात चिंता निर्माण झाली आहे. फुले पिंपळगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या सिंदफणा पब्लिक स्कूलच्या वसतिगृहातील ही घटना आहे. मंगळवारी रात्री जेवणानंतर विद्यार्थ्यांची उपस्थिती तपासली असता तिघेही बेपत्ता असल्याचे आढळले.

बेपत्ता झालेल्या विद्यार्थ्यांची नावे तेजस चव्हाण, दिनेश चव्हाण आणि अभिजीत राठोडअशी आहेत. हे तिघेही इयत्ता दहावीत शिकत असून ते अनुक्रमे पाथरी, नित्रुड आणि आष्टी येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. रात्रीच्या जेवणानंतर वसतिगृहातील नेहमीच्या उपस्थिती प्रक्रियेदरम्यान ते आपल्या कक्षात नसल्याचे समोर आले.

विद्यार्थी दिसत नसल्याचे लक्षात आल्यानंतर वसतिगृह व्यवस्थापनाने तातडीने परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली. शाळेच्या आवारासह आजूबाजूच्या भागातही त्यांचा शोध घेण्यात आला. मात्र बराच प्रयत्न करूनही तिन्ही विद्यार्थ्यांचा ठावठिकाणा मिळाला नाही. ते वसतिगृहातून नेमके कोणत्या वेळी बाहेर पडले आणि कोणत्या मार्गाने गेले, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

घटनेची माहिती मिळताच विद्यार्थ्यांचे नातेवाईक वसतिगृहात दाखल झाले. त्यानंतर या प्रकरणाची नोंद माजलगाव पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. आपलं मूल गायब झाल्याचे समजताच महिला पालकांनी माजलगाव पोलीस ठाण्यातच आक्रोश करत हंबरडा फोडला. हे विद्यार्थी वसतिगृहाच्या सुरक्षिततेतून नेमके कधी, कसे आणि कोणत्या मार्गाने बाहेर पडले, याचा अद्याप उलगडा झालेला नाही.

पोलिसांकडून विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू करण्यात आला असून, त्यांच्या हालचालींबाबत उपलब्ध माहिती तपासली जात आहे. वसतिगृहातील परिस्थिती आणि विद्यार्थ्यांच्या बेपत्ता होण्यामागील परिस्थिती जाणून घेण्यासाठी शाळेचे प्राचार्य तसेच संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी केली जात आहे. त्याचबरोबर वसतिगृह परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून विद्यार्थी नेमके कधी बाहेर पडले , याचा मागोवा घेण्याचे काम सुरू आहे.

तिन्ही विद्यार्थी अल्पवयीन असल्याने त्यांच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांसह वसतिगृह व्यवस्थापनाकडून प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरातील शैक्षणिक वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT