Marathwada Politics : मागील वर्षभरापासून बीड जिल्हा राज्यभरात चर्चेचा विषय ठरला होता. इथे वाढलेली गुंडगिरी, खंडणीचे प्रकार, दहशत, महिलांवरील अत्याचार, खून, दरोडे या ढासळत्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीमुळे ही चर्चा होती. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे खंडणीतून अपहरण आणि निर्घृण हत्या प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले होते.
गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यात अनेक घटना घडल्या आहेत. या घटनांना आळा बसावा म्हणून उपमुख्यमंत्री असताना अजित पवार यांनी पालकमंत्रीपद धनंजय मुंडे यांच्याकडे न देता स्वतःकडे ठेवले होते. पण त्यांच्या अपघाती निधनानंतर पुन्हा जिल्ह्याची घडी विस्कटण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे बीड जिल्ह्याला पूर्व पदावर आणण्याचे प्रयत्न राजकीय मंडळींकडून सुरू आहे.
मुंबईत सुरू असलेल्या विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने नुकतेच जिल्ह्यातील नेते, लोकप्रतिनिधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना बीडमध्ये लक्ष घालण्याची विनंती केली. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादीचे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर, सरपंच संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांना सोबत घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांच्यापुढे जिल्ह्यातील प्रश्न मांडले.
यात बीड जिल्ह्यात तसेच मराठवाड्यात अनेक मल्टिस्टेट सोसायट्यांमध्ये घोटाळे झाले आहेत. ज्यामध्ये ठेवीदारांच्या घामाचे, कष्टाचे पैसे बुडाले आहेत. शासनाने तातडीने या विषयात लक्ष घालून ठेवीदारांना न्याय कसा देता येईल, यावर कार्यवाही करणे आवश्यक आहे, अशी विनंती या शिष्टमंडळाने केली. यावर मुख्यमंत्र्यांनी लवकरच बैठक घेऊन यावर निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले.
दिवंगत संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बंधू धनंजय देशमुख व त्यांच्या कुटुंबियांच्या जीवाला धोका होऊ शकतो. त्यांना तातडीने जिल्हास्तर ऐवजी राज्यस्तरीय सुरक्षा दिली जावी. तसेच या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याला लवकरात लवकर अटक करून या खटल्यात दोषींना फाशीची शिक्षा होण्यासाठी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली. बीड विधानसभा मतदारसंघाच्या अनेक प्रलंबित समस्या आहेत, ज्यावर कार्यवाही होणे गरजेचे आहे. यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात यावी, अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांना करण्यात आली.
या भेटीमागे जिल्ह्यातील स्थानिक राजकारण असल्याचीही चर्चा आहे. अजित पवार यांच्यानंतर सुनेत्रा पवार यांच्याकडे जिल्ह्याचे पालकत्व सोपवण्यात आले आहे. त्यांनीही अजित पवारांना अपेक्षित बीड जिल्ह्याचा विकास करण्याचा शब्द दिला आहे. पण सुनेत्रा पवार यांना अनुभव येण्यास आणि प्रशासकीय कामकाजाची ओळख होण्यासाठी वेळ लागू शकतो. तोपर्यंत धनंजय मुंडे हे पुन्हा जिल्ह्याची सूत्र हातात घेऊ शकतात, ही शक्यता ओळखून धस यांनी फडणवीस यांची भेट घेतल्याची चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.