

Shivsena UBT News : छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील जटवाडा-जोगवाडा येथील 23 एकर शेत जमीनी संदर्भात करून देण्यात आलेला 'हिबानामा' आणि शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरे यांच्या ज्या जावेद शेख नावाच्या चालकाच्या नावे हा हिबानामा आहे, त्यावरून जिल्ह्याच्या राजकारणात मोठा वाद पेटला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी खासदार संदीपान भुमरे यांच्या चालकावर जमीन हडपण्याचा आरोप करताना भुमरे यांच्यावरही निशाणा साधला आहे.
संदीपान भुमरे यांच्या राजकीय पाठबळाशिवाय हे शक्यच नाही, असा दावा करत अंबादास दानवे यांनी काल पत्रकार परिषदेत समृद्धी महामार्गा लगतच्या 23 एकर शेतजमीनीचा तब्बल साडे अकराशे कोटी रुपयांचा मोबदला लाटण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला होता.
यावर खासदार संदीपान भुमरे यांनी आणि त्यापुर्वी आमदार विलास भुमरे या दोघांनीही सर्व आरोप फेटाळले होते. अंबादास दानवे यांच्या डोक्यावर परिणाम झाल्याची टीकाही भुमरे-पिता पुत्रांनी केली. खासदार संदीपान भुमरे यांनी बुधवारी (ता.25) सकाळी पत्रकार परिषद घेऊन अंबादास दानवे यांचे आरोप आणि मुद्दे खोडून काढताना काही दावे केले होते. त्यानंतरही अंबादास दानवे यांनी भुमरे यांना पाच प्रश्न विचारले आहेत.
1. हिबानामा आणि जन्म तारखेतील तफावत: हिबानामा 1971 चा दाखवला जात आहे, परंतु संबंधित चालकाचा जन्म 1985 चा आहे. जन्माच्या 14 वर्षे आधी हा व्यवहार होणे अशक्य आहे. तसेच, हिंदू-मुस्लिम संदर्भात कायद्याने 'हिबानामा' होऊ शकत नाही, मग हा हिबानामा झालाच कसा?
2. गट नंबरची दिशाभूल: तुम्ही ज्या गट नंबर 174 चा उल्लेख करत आहात, तो सध्या अस्तित्वात नाही. सरकारी कागदपत्रांनुसार त्या जागेचा नवीन गट नंबर 89 असा आहे. मग जुन्या नंबरचा उल्लेख करून तुम्ही नेमकी कोणाची दिशाभूल करत आहात?
3. वारसांच्या हक्काकडे दुर्लक्ष: मूळ मालकाच्या वारसांनी वारंवार अर्ज करूनही खासदार किंवा पालकमंत्री म्हणून तुम्ही त्याची दखल का घेतली नाही? आपल्या चालकाच्या नावावर आर्थिक लाभ लाटण्यासाठी तुम्ही जाणीवपूर्वक या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले आहे का?
4. विधानातील विसंगती (दुटप्पी भूमिका): एकीकडे तुम्ही सांगता की, 'सोबतच्या माणसाने बाहेर काय केले हे आपल्याला सांगता येत नाही', मग याच प्रकरणात तुम्ही त्या चालकाच्या सत्यतेची शाश्वती कशी काय घेता? हा जावेद 'तो' नाही, मग कोणता हे स्पष्ट करण्याचे निर्देश तुम्ही खासदार म्हणून प्रशासनाला देणार का?
5. बेकायदेशीर कागदपत्रांच्या आधारे मोबदल्याची मागणी: विषय मोबदल्याच्या रकमेचा नाही, तर मुळात तो 'हिबानामा' झालाच कसा हा आहे. एका बेकायदेशीर आणि संशयास्पद हिबानाम्याच्या आधारे सरकारी मोबदला (मावेजा) मागण्याची हिंमत होतेच कशी?
असे प्रश्न उपस्थित करत अंबादास दानवे यांनी आपण केलेले आरोप आणि दावे योग्य असून त्यावर ठाम असल्याचे म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.