Beed News, 22 Feb : बीडच्या परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांचा हत्येला दोन वर्षे होऊन गेली तरी अद्याप त्यांच्या मारेकऱ्यांना शोधण्यात पोलिसांना यश आलेलं नाही. पोलिसांकडून मुंडे यांच्या आरोपींचा शोध सुरू असतानाच आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
ती म्हणजे महादेव मुंडेंचा मुलगा क्लासवरून घरी येत असताना त्याला वाल्मिक कराडच्या समर्थकांनी भररस्त्यात अडवलं आणि मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतची तक्रार महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पोलिसांत दिली आहे. ज्ञानेश्वरी मुंडेंनी आपल्या मुलांना आणि कुटुंबियांना कराडच्या मुलांपासून धोका असून आम्हाला पोलीस संरक्षण मिळावे अशी मागणीही केली आहे.
शिवाय माझ्या मुलांना काही झालं तर याला पोलीस प्रशासन आणि वाल्मिक कराडची दोन्ही मुलं जबाबदार असही त्यांनी म्हटलं आहे. महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडवर आरोप ठेवण्यात आले आहेत. नुकतंच वाल्मिकच्या घरी काम करणाऱ्या दोघांची पोलिसांनी नार्को टेस्ट केल्याची माहिती समोर आली होती.
अशातच आता ज्ञानेश्वरी मुंडेंनी आपल्या मुलाला मारहाण झाल्याची तक्रार केल्याने पुन्हा एकदा बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ज्ञानेश्वरी मुंडे यांनी याबाबत बीडचे पोलीस अधीक्षकांकडे तक्रार अर्ज दिला आहे. त्यामध्ये त्यांनी लिहिलंय की, वाल्मिक कराडची दोन मुले, सुशील कराड आणि गणेश कराड यांच्याकडून माझ्या परिवारातील सदस्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.
माझ्या परिवारातील सदस्यांबाबत काही अनपेक्षित घटना घडल्यास सुशील कराड आणि गणेश कराड हे जबाबदार असतील. तर, 19 फेब्रुवारी रोजी माझी दोन्ही मुलं, प्रवीण आणि मुंडे हे दोघे घरी असताना त्यांना एका तरुणाने शिवीगाळ करत मारहाणीचा प्रयत्न केला. 'बाल्या' असं त्याचं नाव असून त्याच्या सोशल मीडियावर फक्त वाल्मिक कराडचे स्टेटस दिसतात. त्यामुळे माझ्या दोन्ही मुलांना काही झालं तर त्याला वाल्मिक कराडची मुलं जबाबदार असतील, असंही ज्ञानेश्वरी मुंडेंनी म्हटलं आहे.
दरम्यान, महादेव मुंडेंच्या हत्या प्रकरणातील आरोपी गोट्या गित्ते हा अद्याप बाहेर असून त्याच्यापासूनही आपल्याला धोका असल्याचं ज्ञानेश्वरी मुंडेंनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी कृष्णा आंधळे हा मस्साजोगमध्ये तीन वेळा येऊन गेल्याचा खळबळजनक दावा संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केल्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धीतीवर अनेकांकडून संशय व्यक्त केला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.