

Rajya Sabha Election: आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाची चर्चा सुरू असतानाच, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आपल्या दोन्ही जागांवर दावा प्रबळ केला आहे. संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदी यांनी संसदेत बजावलेली कामगिरी पाहता, या दोन्ही जागा पुन्हा शिवसेनेकडेच राहाव्यात, असे स्पष्ट मत पक्षाचे युवा नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.
यावर प्रसार माध्यमांना आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, सध्याच्या राजकीय परिस्थितीत संसदेत प्रभावीपणे आवाज उठवणाऱ्या खासदारांची देशाला आणि राज्याला गरज आहे. संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदी यांनी गेल्या काही वर्षांत प्रखर विरोधी पक्षाची भूमिका बजावली आहे. अनेक महत्त्वाच्या आणि देश हिताच्या मुद्द्यांवर त्यांनी संसदेत केंद्र सरकारला धारेवर धरले आहे.
धारावी पुनर्विकास आणि मुंबईचे 'अदानीकरण' या विषयला हात घालून मुंबईच्या हितासाठी आणि धारावीकरांच्या हक्कासाठी या दोन्ही खासदारांनी संसदेत सातत्याने आवाज उठवला आहे. इतकेच नाही तर संविधान रक्षण या विषयावर 'इंडिया' आघाडीच्या माध्यमातून लोकशाही आणि संविधान वाचवण्याच्या लढ्यात हे दोन्ही नेते अग्रेसर राहिले आहेत. महाराष्ट्र हित आणि पर्यावरण यात देखील या दोघांनी महत्वाची भूमिका मांडली आहे. राज्याच्या हक्काचे प्रकल्प असोत किंवा पर्यावरणाचा ऱ्हास, या विषयांवर आक्रमक मांडणी करण्यात या खासदारांचा मोठा वाटा आहे.
पक्षाच्या वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेच्या सर्व आमदारांचे असे मत आहे की, ज्या पद्धतीने हे दोन्ही खासदार दिल्लीत पक्षाची आणि राज्याची बाजू मांडत आहेत, ते पाहता या दोन्ही जागा शिवसेना (ठाकरे) कडेच असणे गरजेचे आहे. संख्याबळाचा विचार करता आणि 'इंडिया' आघाडीतील शिवसेनेचे वजन पाहता, मित्रपक्षांनीही या मागणीला पाठिंबा द्यावा, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदी यांनी केवळ पक्षाचीच नाही, तर महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची लढाई दिल्लीत लढली आहे. त्यामुळे या दोन्ही जागा शिवसेनेनेच लढवाव्यात, असा आमचा ठाम आग्रह आहे, यासाठी आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांच्याशी चर्चा करू असे ही आदित्य ठाकरे शेवटी म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.