MLA Laxman Pawar-Dhananjay Munde Sarkarnama
मराठवाडा

Beed Politics : भाजपकडे पाठ; पवारांकडून पुतण्याला मोकळी वाट, 'तुतारी'कडे बोट

Datta Deshmukh

Beed News : अगोदर सरकार आणि पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका करत निवडणूक लढविणार नाही, असे जाहीर करणाऱ्या गेवराईचे भाजप आमदार लक्ष्मण पवारांनी केले होते. आता आपला मोर्चा हळूच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुसटसा पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्याकडेही वळवला.

स्वत: निवडणूक लढविणार नसल्याचा पुनरुच्चार करणाऱ्या आमदार लक्ष्मण पवारांनी आता पुतणे शिवराज पवार यांच्यासाठी वाट मोकळी करुन दिल्याचे मानले जाते. आता त्यांच्या समर्थकांकडून तुतारीकडे बोट दाखविले जात आहे. दरम्यान, लक्ष्मण पवार स्वत: लढणार नसले तरी त्यांचे पुतणे बाळराजे किंवा भावजय गीता पवार निश्‍चित रिंगणात उतरतील असे मानले जाते.

चार दिवसांपूर्वी आगामी विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केल्यानंतर समर्थकांनी त्यांच्या घरामसोर धरणे धरत त्यांना साद घातली. मात्र, पवारांनी आपण लढणारच नाही, असे स्पष्ट करताना भाजप पक्षासह पालकमंत्री धनंजय मुंडेंवर (Dhananjay Munde) थेट गुत्तेदारांसोबत सेटलमेंटचा पुन्हा आरोप केला. तर, पंकजा मुंडे यांनीही लक्ष घातले नाही, अशी खदखद व्यक्त केली.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही चांगला पोलिस अधिकारी दिला नाही असे म्हणत त्यांच्यावरही नाराजी दाखवत आता रिंगणात नकोचा नारा दिला. पण, पुन्हा कोणताच पंडित नको असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अमरसिंह पंडित व शिवसेनेचे माजी मंत्री बदामराव पंडित यांच्यावर टिकास्त्र सोडले.

तुमच्यापैकी कोणीही चालेल अशी साद घातल्यानंतर सहाजिकच पुन्हा समर्थकांनी तुम्हीच अशी नारेबाजी केली. त्यावर पंधरवाड्यात निर्णय देऊ म्हणणाऱ्या लक्ष्मण पवारांनी पुतणे शिवराज बाळराजे पवार यांचेही नाव पुसटसे घेतले. त्यामुळे आता आमदार पवार लढणार नसले तरी पुतणे बाळराजे किंवा भावजय गीता पवार निवडणुक रिंगणात असतील असे निश्‍चित मानले जाते.

कारण मागच्या काही महिन्यांत मतदार संघातील विकास कामांच्या भूमिपुजन, उद॒घाटन कार्यक्रमांसह लोकसभा निवडणुक ्रपचाराची सुत्रे शिवराज व त्यांच्या आई गिता पवार यांच्याच हाती आहेत.

दरम्यान, पवारांनी पक्षावर आणि सरकारवर नाराजी व्यक्त केल्याने त्यांनी भाजपकडे पाठ फिरविल्यावरही शिक्कामोर्तब झाले. त्यातच समर्थकांनीही त्यांच्या कार्यालयाबाहेरील भाजपचा नामफलक काढून टाकत आता ‘तुतारी हाती’ घेण्याचा सल्ला त्यांना दिला.

महायुतीत राष्ट्रवादीच्या सहभागानंतर पालकमंत्रयांनी आपल्या मतदारसंघातील सर्व समित्या बरखास्त करुन विरोधकांच्या नेमल्याचा आरोप केला. वाळू चोरीत इंटरेस्ट असणारे पोलिस अधिकारी दिले. पुन्हा त्यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर खालच्या पातळीवरचे राजकारण केल्याचा आणि विकासकामांत अडथळा आणून मानसिक त्रास दिल्याचा आरोप केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT