Bajrang Sonawane-Ajit Pawar-Dhananjay Munde In Beed News Sarkarnama
मराठवाडा

Dhananjay Munde-Bajrang Sonawane : बीडची रेल्वे धावली अन् नेते रुळावर! धनुभाऊ- बजरंग बप्पा अन् अजितदादा गप्पात रंगले!

Bajrang Sonawane-Dhananjay Munde-Ajit Pawar In Beed : धनंजय मुंडे यांना माणसं ओळखता येत नाहीत. बजरंग सोनवणे यांना मदत करू नको, असे मी सांगितले होते पण त्याने ऐकले नाही.

Jagdish Pansare

  1. बीडच्या रेल्वे उद्घाटनाच्या निमित्ताने खासदार बजरंग सोनवणे, धनंजय मुंडे आणि अजित पवार एकत्र आले.

  2. या नेत्यांमध्ये अनौपचारिक गप्पा रंगल्याने राजकीय चर्चेला उधाण आले.

  3. या भेटीमुळे बीड जिल्ह्यातील आगामी राजकारणाबाबत अनेक तर्कवितर्क रंगू लागले.

Ahilyanagr-Beed Railway Inauguration : बीड मधून रेल्वे धावावी हे सर्वसामान्य आणि जिल्ह्यातील सर्वपक्षीय राजकीय नेत्यांचे स्वप्न आज अखेर सत्यात उतरले. अहिल्यानगर ते बीड मार्गावर धावणाऱ्या पहिल्या रेल्वेला आज हिरवा झेंडा दाखवण्यात आला. या सोहळ्याला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते आवर्जून उपस्थित होते. लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीतील जय- पराजयानंतर एकमेकांना पाण्यात पाहणारे नेते एकाच व्यासपीठावर शेजारी बसून गप्पा मारताना दिसल्यानंतर बीडची रेल्वे धावली अन् नेते रुळावर आले असेच म्हणावे लागेल.

बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे, (Bajarang Sonawane) माजी मंत्री धनंजय मुंडे, सरकारमधील मंत्री पंकजा मुंडे या जिल्ह्यातील नेत्यांना बीडच्या रेल्वेने एकत्र आणल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या साक्षीने गेल्या दीड - दोन वर्षापासून एकमेकांवर सातत्याने टीका आणि आरोप करणाऱ्या या नेत्यांमध्ये काही काळ का होईना जवळीकता निर्माण झाली. धनुभाऊ-बजरंग बप्पा आणि अजितदादा यांच्यात रंगलेल्या गप्पा आणि हास्यविनोदाने अनेकांच्या भुवयाही उंचावल्या.

आरक्षणाच्या मुद्द्यावरून तापलेले राजकीय वातावरण त्यातून बीड आणि विशेषत: मराठवाड्याच्या अनेक भागात सुरू असलेला मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष त्यातून जातीजातीमध्ये निर्माण झालेली कटुता याचा अनुभव सध्या सर्वसामान्य लोक घेत आहेत. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर जिल्ह्यातील राजकारणाला वेगळेच वळण लागले. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या विश्वासातील वाल्मीक कराड व इतरांची नावे या खून प्रकरणात आल्यानंतर त्याचा परिणाम धनंजय मुंडे यांच्या राजकीय कारकीर्दीवर झाला.

आका, त्यांचे नेते पाठीराखा म्हणून मुंडे यांच्यावर टीका आणि आरोप झाले. अगदी मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यासाठी कधीकाळी त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे जुने सहकारी आणि जिल्ह्याचे विद्यमान खासदार बजरंग सोनवणे आघाडीवर होते. संदीप क्षीरसागर यांच्यासह इतर विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी रान पेटवली होते. अखेर धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेऊनच ही मंडळी थांबली. तेव्हापासून खासदार बजरंग सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर, भाजपच्या नेत्या मंत्री पंकजा मुंडे यांचा एकाच व्यासपीठावर येण्याचा फारसा योग आला नाही. किंवा आला तरी तो या नेत्यांनी टाळला.

जिल्हा नियोजन समितीची बैठक असो की मग पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्ह्यातील विकास कामांचे उद्घाटन, लोकार्पण सोहळे असो, एकत्र आले तरी या नेत्यांनी एकमेकांकडे साधा कटाक्ष ही टाकला नाही. हे संपूर्ण जिल्ह्याने बघितले. बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सुरुवातीपासून वरचष्मा राहिला आहे. धनंजय मुंडे हे या पक्षाचे जिल्ह्यातील प्रमुख नेते म्हणून ओळखले जातात. मात्र सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर हे चित्र बदलले. अजित पवारांनाही आपल्या विश्वासू सहकाऱ्याला दूर करून स्वतःच्या हाती बीडची सूत्र घ्यावी लागली.

धनंजय, बजरंगला मदत करू नको..

आपले मंत्रिपद घालवण्यात जिल्ह्यातील ज्या नेत्यांचा सहभाग होता त्या सगळ्यांवर मुंडे यांचा राग आहे. खासदार बजरंग सोनवणे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असताना धनंजय मुंडे यांनी अनेकदा राजकीय मदत केल्याचे बोलले जाते. अगदी त्यांच्या साखर कारखान्याला सरकारी कर्ज मिळवून देण्यात धनंजय मुंडे यांचा मोठा वाटा होता. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर बजरंग सोनवणे यांनी मुंडे आणि अजित पवारांची साथ सोडत शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. यावर बीडच्या एका सभेत बोलताना अजित पवारांनी धनंजय मुंडे यांना माणसं ओळखता येत नाहीत. बजरंग सोनवणे यांना मदत करू नको, असे मी सांगितले होते पण त्याने ऐकले नाही. तू आता माणसं ओळखायला माझ्याकडून शिक, असा सल्ला तेव्हा मुंडेंना दिला होता.

बजरंग सोनवणे यांचा शरद पवारांबरोबर जाण्याचा निर्णय किती योग्य होता हे 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीतून दिसून आले. पंकजा मुंडे यांचा पराभव करून बजरंग सोनवणे यांनी दिल्ली गाठली. तेव्हापासून सोनवणे आणि पंकजा- धनंजय या मुंडे बहीण भावापासून ते दुरावले गेले. जिल्ह्याच्या राजकारणात खासदार म्हणून बजरंग सोनवणे यांचा वावर आणि प्रभाव वाढला तर धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद गेल्यामुळे ते नव्याने आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी धडपडत आहेत. पंकजा मुंडे मंत्री झाल्या असल्या तरी जिल्ह्यात विरोधी पक्षाचा खासदार असल्याने त्यांची वाटचाल ही आस्ते कदम सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर आणि जिल्ह्यातील बदललेल्या राजकीय घडामोडी पाहता अहिल्यानगर- बीड रेल्वेच्या उद्घाटन प्रसंगी या नेत्यांचे एकत्र येणे आणि त्यांच्यात संवाद होणे हे शुभ संकेत मानले जात आहेत. बजरंग सोनवणे आणि धनंजय मुंडे हे या कार्यक्रमात एकमेकांच्या शेजारी बसले. एरवी विरुद्ध दिशेला तोंड करून बसणाऱ्या या जुन्या सहकाऱ्यांमध्ये आज संवादही झाला. एकमेकांशी त्यांनी बराच वेळ गप्पा मारल्याने यातून तणाव काहीसा निवळत आहे, ही बाब महत्त्वाची म्हणावी लागेल. बीडच्या रेल्वेसाठी खासदार म्हणून आपण काय प्रयत्न केले, किती निधी आणला हे बजरंग सोनवणे यांनी आपल्या भाषणात सांगितले.

त्याला फारसा विरोध पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात केला नाही. परंतु माजी खासदार प्रीतम मुंडे आणि दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्यासह केशरकाकू क्षीरसागर आणि आतापर्यंतच्या सर्व खासदार आणि जिल्ह्यातील नेत्यांचा उल्लेख त्यांनी केला. श्रेय वादामध्ये न जाता ज्यांनी ज्यांनी बीड रेल्वेसाठी प्रयत्न केले त्या सर्वांचे आभार मानताना पंकजा मुंडे यांनी बजरंग सोनवणे यांच्या नावाचाही उल्लेख केला. बीड जिल्ह्याचे हे बदलते राजकारण येणाऱ्या काळात जिल्ह्याच्या विकासासाठी पूरक ठरणार आहे.

राजकीय मतभेद बाजूला सारून हे महत्त्वाचे नेते यापुढेही एकत्र येतील, अशी आशा आहे. बीड जिल्ह्याची सूत्र पालकमंत्री म्हणून अजित पवार यांनी हाती घेतल्यानंतर होणारा हा सकारात्मक बदल निश्चितच जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. बीड रेल्वेच्या निमित्ताने व्यासपीठावर सर्वपक्षीय नेते आणि लोकप्रतिनिधी यांच्यात दिसलेले हे खेळीमेळीचे वातावरण यापुढेही कायम राहो, अशाच सर्वसामान्य बीडकरांच्या अपेक्षा असतील.

FAQ

प्र.1. बीडच्या रेल्वे लोकार्पणाच्या निमित्ताने कोणते नेते भेटले?
बजरंग सोनवणे, धनंजय मुंडे आणि अजित पवार भेटले.

प्र.2. ही भेट कुठे झाली?
बीड जिल्ह्यातील रेल्वे उद्घाटनाच्या कार्यक्रमात ही भेट झाली.

प्र.3. या भेटीत काय झाले?
नेत्यांमध्ये अनौपचारिक गप्पा रंगल्या.

प्र.4. या भेटीमुळे काय चर्चा सुरू झाली?
राजकीय समीकरणांबाबत चर्चांना उधाण आले.

प्र.5. या भेटीचा पुढील राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो?
आगामी निवडणुकांमध्ये युती किंवा नवीन समीकरणांची शक्यता व्यक्त केली जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT