Beed NCP News: बीड जिल्ह्याच्या राजकारणात दिवाळीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये मोठा बाॅम्ब फूटण्याची शक्यता आहे. 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाचे कमळ सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तुतारी फुंकणारे अन् जिल्हाध्यक्षपद भूषवणारे राजेंद्र मस्के दोन-अडीच वर्षातच पक्षांतराच्या वाटेवर आहेत. स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर यांच्याशी पटत नसल्याने त्यांनी विरोधात बसण्यापेक्षा सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाट धरण्याचा निर्णय पक्का केला असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.
बीड जिल्ह्यात नगरपरिषदेतील सत्तांतरात महत्त्वाची भूमिका बजावणारे आणि राष्ट्रवादीचे नेतृत्व करणारे गेवराईचे आमदार अमरसिंह पंडित यांच्या संपर्कात मस्के असल्याचे बोलले जाते. पक्षाच्या बैठकांना दांडी मारून सत्ताधारी राष्ट्रवादीच्या नेत्यांशी मस्के यांची वाढती जवळीक पाहता दिवाळी पुर्वीच ते तुतारी सोडून मनगटावर घड्याळ बांधतील, अशी दाट शक्यता आहे. अर्थात मस्के यांनी मात्र अद्याप असा काही निर्णय झालेला नाही, माझ्याकडे कौटुंबिक सोहळ्याची धामधूम असल्याने मी पक्षाच्या काही बैठकांना हजर राहू शकलो नाही, हे खरे असले तरी मी पक्षांतराबाबत कुठलाही निर्णय घेतलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागरांपासून दुरावत थेट आमदार विजयसिंह पंडित यांच्याशी गुप्त राजकीय चर्चा सुरू केल्याचे बोलले जाते. दिवाळीपूर्वी मस्केंच्या पक्षप्रवेशाचे फटाके फुटण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या राजकीय घडामोडींना अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र मस्के हे लिंबागणेश जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळवण्यासाठी उत्सुक आहेत. या बदल्यात पक्षाच्या पंचायत समितीच्या दोन्ही उमेदवारांचा संपूर्ण आर्थिक व प्रचारकी भार उचलण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. यासाठी ते आपले विद्यमान जिल्हाध्यक्षपदाचा त्याग देण्यास तयार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
मस्केंच्या घरातील एका शुभकार्यामुळे हा पक्षप्रवेश काहीसा लांबला असला, तरी पडद्यामागची जुळवाजुळव पूर्ण झाली आहे. मस्केंचा राजकीय प्रवास अत्यंत उलथापालथीचा राहिला आहे. मराठा महासंघापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास भाजप, पुन्हा राष्ट्रवादी, शिवसंग्राम आणि त्यानंतर पुन्हा भाजप मार्गे शरद पवार यांच्या पक्षात असा झाला आहे. लोकसभेपूर्वी त्यांनी पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांना जिल्हाध्यक्षपदाची धुरा मिळाली होती.
मात्र, आता बीड मतदारसंघाची सूत्रे आमदार विजयसिंह पंडितांकडे आल्याने त्यांनी पंडितांच्या गटाची वाट धरली आहे. या संभाव्य पक्षप्रवेशामुळे बीडच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार असून, पंडितांनी आखलेल्या या व्यूहरचनेमुळे आमदार संदीप क्षीरसागर यांना मोठा धक्का बसण्याची चिन्हे आहेत. तसेच, घड्याळ हातात घेऊ पाहणाऱ्या इतर स्थानिक इच्छुकांची मात्र यामुळे मोठी पंचाईत झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.