Dhananjay Munde News Sarkarnama
मराठवाडा

Dhananjay Munde News : मराठा आंदोलनात बीड एवढं जळालं ; पण पालकमंत्री धनंजय मुंडेंना पाहायला वेळ नाही ?

Datta Deshmukh

Beed News : मराठा आंदोलनात बीड जिल्ह्यात जाळपोळ,दगडफेक, वाहन तोडफोडीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या. गेल्या सात ते आठ दिवसांपासून हिंसक घटना घडत आहेत.या घटनांमुळे जनजीवन विस्कळीत झाले.कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले, मात्र पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) याची कधी पाहणी करणार असा प्रश्न आहे.

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र व आरक्षण मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी (ता. अंबड, जि. जालना) येथे ऑक्टोबरपासून उपोषण सुरु केल्यानंतर जिल्ह्यात देखील त्यांच्या समर्थनार्थ सर्कल निहाय साखळी उपोषणे, कॅन्डल मार्च, धरणे, रस्ता रोको अशी आंदोलने झाली. अद्यापही काही ठिकाणी उपोषणे सुरु आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, गेल्या शनिवारी बीडमध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस जाळली तर दुसऱ्या दिवशी दोन बस फोडल्या. सोमवारी तर माजलगावात आमदार प्रकाश सोळंके (Prakash Solanke) यांच्या घरावर दगडफेक, वाहनांची जाळपोळ, घरातल्या वास्तू व काचांची तोडफोड केली. याचे लोण दुपारनंतर बीड शहरात देखील आले.

क्षीरसागर यांच्या बंगल्याची जाळपोळ,माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या कार्यालयाला आग,आमदार सोळंके यांचे भाऊ धैर्यशील सोळंके यांचे घर,शिवसेना जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांचे कार्यालय तसेच सनराईज हॉटेलला आग तर शुभम ज्वेलर्स,भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांचे कार्यालय, शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांचे कार्यालय,स्वराज हॉटेल यासह इतर अनेक ठिकाणी देखील तोडफोड करण्यात आली.जिल्ह्यात संचारबंदी देखील लावावी लागली.

गृह विभागाचे अनेक वरिष्ठ अधिकारी बीडमध्ये तळ ठोकून होते. हिंसक घटना व जमावबंदीचे आदेशाचे उल्लंघन केल्याचे तब्बल 65 गुन्हे नोंद झाले आहेत.हिंसक घटनांमध्ये 307 सारखे गंभीर कलम लावले आहेत.दीडशेच्या अपसपास संशयित पोलिसांनी पकडले आहेत.11 कोटी रुपये नुकसानीचा अहवाल दिला आहे. एवढं सगळं घडून देखील जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी अद्याप याची पाहणी केली नाही.

यापूर्वीचे पालकमंत्री अतुल सावे (Atul Save) जिल्ह्याबाबत कायम उंटावरून शेळ्या हाकत.अतिवृष्टी होऊ किंवा दुष्काळ अतुल सावे यांना काही एक देणेघेणे नसे.मात्र,धनंजय मुंडे जिल्ह्याचे भूमिपुत्र असल्याने पालकमंत्री म्हणून त्यांच्यावर जिल्ह्याचे पालक म्हणून जबाबदारीपेक्षा जिल्हावासियांच्या अपेक्षा कैक पटीने अधिक आहेत. आता मुंडे पाहणी आणि आढाव्यासाठी कधी येतात हे पाहावे लागेल

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT