uday samant Sarkarnama
मराठवाडा

Uday Samant : 'बीडची जागा शिवसेनेलाच', उदय सामंतांचा दावा; भाजप, अजित पवार गटात खळबळ

Dattatrya Deshmukh

Beed News : येत्या काळात महायुतीमध्ये बीड विधानसभेची जागा कोणाच्या वाट्याला येणार यावरून घटक पक्षात मोठ्या प्रमाणात रस्सीखेच सुरु आहे. या जागेसाठी महायुतीमधील भाजप, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात मोठी चुरस आहे. तीन पक्षांकडून दिग्गज मंडळीने रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे.

बीड विधानसभेची जागा ही जिल्ह्यातील शिवसैनिकांसाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बीडची जागा ही शिवसेनेसाठीच राहिल यासाठी स्वत: प्रयत्न करावेत, अशी मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांनी केली.

यावर उद्योग मंत्री उदय सामंत यांनीही बीड विधानसभेची जागा शिवसेनेचीच होती आणि शिवसेनेचीच राहिल, याबद्दल कोणाच्याही मनात शंका नको. बीड शिवसेनेचा बालेकिल्ला होता आणि बालेकिल्लाच राहील, असा विश्वास व्यक्त करत यासाठी शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात कष्ट घ्यावेत, असे आवानही त्यांनी केले.

येथील शिवसेना जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद॒घाटन उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले. यावेळी श्री. खांडे यांच्यासह माजीमंत्री प्रा. सुरेश नवले, लोकसभा संपर्कप्रमुख डॉ. विजय पाटील, खांडे, रामगडाचे योगीराज महाराज, बाजीराव चव्हाण, कामरान खान, श्रीमती जायभाये, श्रीमती गोरे, जयसिंग चुंगडे, गणेश उगले, परमेश्‍वर तळेकर, कल्याण कवचट, अजंय सुरवसे, गणेश डोईफोडे, पांंडुरंग गवते उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उदय सामंत (Uday samant) म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्याइतका कार्यक्षम मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला नव्हता. सर्वसामान्यांचा विकास हाच त्यांचा ध्यास आहे. बीड विधानसभेचे तिकिट हे शिवसैनिकालाच मिळणार आहे. आतापासूनच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी घेतलेले निर्णय तळागाळातपर्यंत पोहचवण्याचे काम शिवसैनिकांनी करावे.

जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची धडाडी कौतुकास्पद आहे. संकटातून स्वत:ला सावरत शिवसैनिकांना हक्काचे व्यासपीठ या संपर्क कार्यालयामुळे मिळाले आहे. जिथे तुम्हाला माझी गरज लागेल त्या ठिकाणी फक्त आवाज द्या, पाठीशी खंबीरपणे असल्याची ग्वाही त्यांनी दिली. बीडच्या एमआयडीसी अंतर्गत रस्त्यांसाठी मी लवकरच मोठा निधी देणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

(Edited by : Sachin Waghmare)

SCROLL FOR NEXT