Bhagwat Karad sarkarnama
मराठवाडा

Bhagwat Karad News : लोकसभेच्या उमेदवारीसाठी कराडांकडून देवाचा धावा!

Jagdish Pansare

Loksabha Election 2024 News : लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊन एक आठवडा उलटला आहे. परंतु छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा शिवसेना लढवणार की भाजप? याचा फैसला अद्यापही झालेला नाही. दोन्ही पक्षांनी या जागेवर आपला दावा सांगत जोर लावल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्यातील भाजप नेत्यांनी यावर तोडगा काढण्यासाठी दिल्ली गाठली आहे.

दुसरीकडे संभाजीनगरची जागा भाजपच लढवणार, असे ठामपणे सांगत संभाव्य उमेदवार केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड(Bhagwat Karad) यांनी देवाचा धावा केला आहे. नुकतेच त्यांनी शनिशिंगणापूर येथे जाऊन दर्शन घेतले. कराड दीड वर्षापासून संभाजीनगरातून लोकसभेची तयारी करत आहेत. मात्र शिवसेना शिंदे गट या जागेवरचा आपला दावा सोडायला तयार नाही.

शिवाय राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या माध्यमातून कराड यांना उमेदवारीसाठी नवा स्पर्धकही तयार करण्यात आला आहे. एकीकडे एकनाथ शिंदे गटाचा दावा तर दुसरीकडे पक्षातून स्पर्धा अशा कात्रीत अडकलेल्या कराड यांनी अखेर उमेदवारीसाठी आता देवाचाच धावा केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याआधी त्यांनी जिल्ह्यातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या वेरूळच्या घृष्णेश्वराचे दर्शन घेतले होते. तसेच खुलताबादच्या भद्रा मारुतीला साकडे घातले होते. मात्र उमेदवारीचा तिढा काही सुटता सुटेना. अखेर ही साडेसाती दूर करण्यासाठी कराड यांनी शनिशिंगणापूर येथे शनि देवाला साकडे घालत तेल वाहिले.

आज आणि उद्या होळी आणि धुलीवंदनाची सुट्टी असल्यामुळे महाराष्ट्रातील महायुतीच्या जागावाटपा बद्दल कुठलाही निर्णय होण्याची शक्यता नाही. धुलीवंदन झाल्यानंतरच जागा वाटपाचा तिढा सुटून छत्रपती संभाजीनगर मधून शिवसेना लढणार की भाजप हे स्पष्ट होईल. आणि त्यानंतरच उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडते हेही स्पष्ट होईल. कराड यांनी शिंगणापूर येथे जाऊन शनि देवाची केलेली प्रार्थना फळाला येते का? त्यांना उमेदवारी मिळते का हे काही तासातच स्पष्ट होणार आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT