Nanded Lok Sabha News Sarkarnama
मराठवाडा

Nanded Lok Sabha: दाजी-मेहुण्याची जोडी महाविकास आघाडीसाठी गेम चेंजर ठरणार?

Nanded Politics: खतगावकर-चव्हाण यांची जोडी महायुतीला धक्का देणार?

Laxmikant Mule

Nanded: लोकसभा निवडणुकीची घोषणा केव्हाही होऊ शकते हे गृहीत धरून सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने नांदेडची जागा प्रतिष्ठेची केली असून या जागेवर विजय संपादन करण्याचा निर्धार केला आहे. ज्येष्ठ नेते माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर व‌ माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण एकत्र आल्यामुळे ही दाजी-मेहुण्याची जोडी या निवडणुकीत महाविकास आघाडी साठी गेम चेंजर ठरण्याची शक्यता आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत हुकलेला विजय अशोक चव्हाण कोणत्याही परिस्थितीत यावेळी खेचून आणण्याच्या प्रयत्नात आहेत, यासाठी खतगावकर यांचीही भक्कम साथ त्यांना लाभणार आहे. दोघांनीही प्रचाराची धुरा सांभाळत विधानसभा मतदारसंघ निहाय मोर्चे बांधणीला सुरवात केली आहे.

गेल्या निवडणुकीत झालेल्या चुका सुधारून निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी खतगावकर आणि चव्हाण झपाटून कामाला लागले आहेत. महाविकास आघाडीच्या जागावाटपाची वाट न पाहता काँग्रेसने नांदेड लोकसभा मतदारसंघात सध्या तरी निवडणुकीचा तयारीत आघाडी घेतल्याचे चित्र दिसून येते.

ज्येष्ठ नेते खतगावकर हे मुरब्बी राजकारणी आणि चांगला जनसंपर्क असलेले नेते आहेत. तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे निवडणूक मॅनेजमेंट गुरू म्हणून ओळखले जातात. या दोन नेत्यांनी जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कामाला लावून वातावरण निर्मिती करण्यात दोघांनाही यश आले आहे.

बिलोली, देगलूर, मुखेड, नायगाव या भागात खतगावकर व त्यांच्या सुनबाई डॉ. मिनल पाटील खतगावकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनसंपर्क वाढविला आहे. गावोगावी जाऊन मतदारांशी संवाद साधने, बैठक, मेळावे घेऊन वातावरण निर्मिती केली जात आहे.

गेल्या निवडणुकीत माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर हे भाजपमध्ये होते.याचा फटका अशोक चव्हाण यांना बसला होता.आत्ता खतगावकर हे काँग्रेसमध्ये आहेत.याचा फायदा काँग्रेसच्या उमेदवाराला पर्यायाने अशोक चव्हाण यांनाच होणार आहे.

नांदेड शहर व भोकर विधानसभा मतदारसंघात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे स्वतः लक्ष घालत आहेत. भोकर विधानसभा मतदारसंघातून‌ काँग्रेसला मोठ्या मताधिक्याची अपेक्षा आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून अशोक चव्हाण 98 हजारांचे मताधिक्य घेऊन निवडून आले होते. हे मताधिक्य टिकून राहिले तर लोकसभेच्या निवडणुकीत विजय सोपा होईल हे ग्रहीत धरून अशोक चव्हाण स्वतः लक्ष घालत आहेत.

नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला चांगले मताधिक्य मिळाले आहे. हे मताधिक्य कायम ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात गेल्या निवडणुकीत नाममात्र मताधिक्य मिळाले होते. या मतदार संघात काँग्रेसचे मोहन आण्णा हंबर्डे हे आमदार आहेत. त्यांच्यावर या मतदारसंघाची जबाबदारी टाकण्यात आली आहे.

नांदेडची जागा पुन्हा जिंकण्यासाठी भास्करराव पाटील खतगावकर व अशोक चव्हाण यांनी गेल्या काही महिन्यांपासून तयारी सुरू केली आहे. या दोन नेत्यांनी निवडणुकीची सुत्र हाती घेतली असून नांदेड हे लातूर, हिंगोली, परभणी या तीन लोकसभा मतदारसंघाचे केंद्र आहे. 

मराठवाड्यातील आठ जागांपैकी चार जागांसाठी आघाडीच्या उमेदवारांना भास्करराव पाटील खतगावकर व‌ माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे नांदेड मधून खुप मोठे राजकीय पाठबळ मिळणार आहे. या दोन्ही नेत्यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार फिल्डींग लावली असून नांदेड लोकसभा मतदारसंघात खतगावकर अशोक चव्हाण यांची जोडी महायुतीला धक्का देऊ शकते.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT