hemant patil krupal tumane bhavan gawali eknath shinde sarkarnama
मराठवाडा

Hemant Patil : भावना गवळी अन् तुमानेंना दिलेला शब्द CM शिंदेंनी पाळला; हेमंत पाटलांचं काय?

Hemant Patil News : हेमंत पाटलांची उमेदवारी रद्द करून त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना वाशिम-यवतमाळ मतदारसंघातून उतरविण्यात आलं होतं.

Akshay Sabale

शिवसेनेत बंडखोरी झाल्यानतंर 13 खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले होते. यातील निम्माहून अधिक खासदारांना ते निवडून येणार नाहीत, असा सर्व्हे दाखवून त्यांची तिकीटं कापण्यात आली होती. याची झळ हेमंत पाटील, भावना गवळी, कृपाल तुमाने यांनाही बसली.

पाटील, गवळी आणि तुमाने यांचं तिकीट कापण्यात आलं. "तिकीट कापलेल्या खासदारांना पुन्हा संधी देऊ. त्यांना रिकामं ठेवणार नाही," असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी दिलं होतं. त्यानुसार भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना विधान परिषदेवर घेत संधी मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला. पण, हेमंत पाटील यांचं काय? त्यांना कधी संधी मिळणार? अशी चर्चा आता कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे.

2022 च्या जून महिन्यात शिवसेनेत ( Shivsena ) मोठं बंड झालं. त्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवर दावा सांगितला आणि भाजपसोबत सरकार स्थापन केलं. तेव्हा, शिंदे यांना अनेक खासदार आमदारांनी पाठिंबा दिला. हिंगोलीचे तत्कालीन खासदार हेमंत पाटील यांनीही एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे उभे राहण्याचा निर्णय घेतला.

शिंदे गटात गेल्यानंतर हेमंत पाटलांवर ( Hemant Patil ) उपनेते पदाची जबाबदारी देण्यात आली होती. 2019 च्या लोकसभेला दीड लाख मतांनी निवडून येणाऱ्या हेमंत पाटलांना 2024 मध्ये पुन्हा तिकीट देण्यात आलं होतं. पण, काही दिवसांतच पाटलांचा 'पत्ता' कट करून हदगावचे बाबुराव कदम यांना उमेदवारी देण्यात आली.

हेमंत पाटलांची उमेदवारी रद्द करून त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना वाशिम-यवतमाळ मतदारसंघातून उतरविण्यात आलं. तेथील तत्कालीन खासदार भावना गवळी यांचंही तिकीट कापण्यात आलं होतं. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी भावना गवळी यांचं पुनर्वसन करण्याचा शब्द दिला होता. मात्र, गवळींच्या नाराजीचा फटका बसला आणि राजश्री पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला.

हिंगोली-वाशिम-यवतमाळप्रमाणे रामटेकचे तत्कालीन खासदार कृपाल तुमाने यांचंही तिकीट कापण्यात आलं होतं. मात्र, मुख्यमंत्री शिंदे यांनी 'शब्दा'ला जागून भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना विधान परिषदेच्या माध्यमातून पुन्हा राजकारणाच्या प्रवाहात आणलं. पण, हेमंत पाटलांना अद्याप कुठेही संधी देण्यात आली नाही.

विधानसभेच्या रिंगणात उतरणार?

विधान परिषदेत हेमंत पाटील किंवा त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना संधी देण्यात येणार असल्याचं बोललं जात होते. परंतु, भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना संधी देण्यात आली. त्यामुळे पाटील विधानसभेच्या रिंगणात उतरले जाण्याची शक्यता आहे. हदगाव अथवा नांदेड दक्षिणमधून हेमंत पाटलांना उतरविले जाऊ शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT