Bhokardan NCP News: भोकरदन नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदासाठी मंगळवारी झालेल्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. काँग्रेसच्या एका नगरसेवकाने क्रॉस वोटिंग करत भाजपच्या उमेदवाराला मदत केल्याने उपनगराध्यक्ष पदासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये समान संख्या झाली. यावेळी नगराध्यक्षांना मिळालेल्या अधिकारात त्यांनी आपल्याच पक्षाच्या उमेदवाराच्या पारड्यात मत टाकले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुरेखा जाधव या उपनगराध्यक्षपदी विराजमान झाल्या.
अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या सुरेखा जाधव या उपनगराध्यक्षपदी निवडून आल्या. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि भाजप या दोन्ही प्रमुख पक्षांकडे स्पष्ट बहुमत नसल्याने, अवघ्या दोन नगरसेवक असलेल्या काँग्रेस पक्षाची भूमिका निर्णायक होती.
काँग्रेसच्या दोन नगरसेवकांपैकी गयाबाई रमेश जाधव या नगरसेविका तटस्थ राहिल्या तर दुसऱ्या नगरसेविका बिस्मिल्लाबी सलीम खान पठाण यांनी भाजपच्या बाजूने मतदान केले. भाजप व राष्ट्रवादी दोघांमध्ये दहा विरुद्ध दहा समान मते पडल्यामुळे नगराध्यक्ष समरीन मिर्झा यांनी विशेष मताधिकार वापरून मतदान केले व मतदानामुळे राष्ट्रवादीच्या सुरेखा जाधव या विजयी झाल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने प्रभाग क्र.3 च्या नगरसेविका सुरेखा बाळासाहेब जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता.तर भाजपकडून प्रभाग 5 चे नगरसेवक प्रा.रणवीर सिंह लक्ष्मणराव जाधव यांनी उपनगराध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे 9, भाजपचे आठ व शिवसेना शिंदे गटाचा एक यांनी मतदानाचा हक्क बजावला.
स्वीकृत सदस्य पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून प्रा. नईम कादरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. प्रा. नईम कादरी हे गेल्या दहा वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष असून सुशिक्षित व एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे . मागील नगरपरिषद निवडणुकीत त्यांच्या पत्नी राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार होत्या. थोड्या मतांनी त्यांचा पराभव झाला होता. भाजपकडून स्वीकृत नगरसेवक पदासाठी अनुभवी चेहरा देण्यात आला. जिल्हा उपाध्यक्ष मुकेश चिने यांची स्वीकृत नगरसेवक पदी बिनविरोध निवड करण्यात आली.
नगरपालिका निवडणुकीतील सत्ता गमावलेल्या काँग्रेसला एक मत फुटल्याने धक्का बसला. यंदाची निवडणूक आम्ही राष्ट्रवादी व भाजप यांच्या विरोधात लढल्यामुळे उपनगराध्यक्षपदासाठी काँग्रेसने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली . मात्र एका नगरसेवकाने पक्षाच्या आदेशा विरोधात भाजपाला मतदान केले. संबंधित नगरसेवकावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.