Aurangabad : राज्यातील सत्तांतरानंतर शिंदे गटातील ४० आमदारांवर ठाकरेंची उद्धवसेना व महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी व काॅंग्रेस अक्षरशः तुटून पडले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील पालकमंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) आणि वैजापूरचे आमदार प्रा. रमेश बोरनारे यांना तर महाविकास आघाडीने जणू लक्ष्य केले आहे. भुमरेंच्या पैठण आणि बोरनारे यांच्या वैजापूर मतदारसंघात आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीचे अजित पवार यांचे दौरे सुरू झाले आहेत.
भुमरेंच्या पैठण मतदारसंघात तर आदित्य ठाकरे यांच्या तीन सभा झाल्या. (Shivsena) अजित पवारही नुकतेच येवून गेले. शिंदे गटाच्या जिल्ह्यातील विशेषतः भुमरे आणि बोरनारे यांना टार्गेट केले जात असतांना आता ते एकमेकांच्या मदतीला धावून जात आहेत. रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांनी बोरनारे (Ramesh Bornare) यांच्या मतदारसंघातील ५६ गावांतील पेव्हर ब्लाॅकच्या कामसाठी पावणे नऊ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत वैजापुर-गंगापूर मतदार संघातील ५६ गावांना पेव्हर ब्लॉकसाठी ८ कोटी ८० लाख रुपये मंजुर करण्यात आले आहेत. याबद्दल रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपान भूमरे यांचे आमदार रमेश बोरनारे यांनी मन:पुर्वक आभार मानले आहेत. शिंदे यांनी केलेल्या बंडात जिल्ह्यातील पाच आमदार सहभागी झाले होते.
संदीपान भुमरे, संजय शिरसाट, रमेश बोरनारे, प्रदीप जैस्वाल आणि अब्दुल सत्तार. पैकी महाविकास आघाडीने भुमरे आणि बोरनारे यांच्याविरोधात जोरदार आघाडी उघडली आहे. वैजापूर तालुक्यातील महालगांव येथे आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद मोहिमे दरम्यान दगडफेक झाल्यानंतर बोरनारे यांच्यावर आरोप करण्यात आले होते. तर भुमरे यांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरे आणि अजित पवार यांच्याकडून त्याच्या वाईनबारचा उल्लेख करत टीका करण्यात आली होती.
विरोधक आक्रमक झालेले असतांना एकमेकांना मदत करून ताकद देण्याचे धोरण शिंदे गटाने आखले आहे. बोरनारे यांच्या मतदारंसघातील कामासाठी भुमरे यांनी दिलेला पावणे नऊ कोटींचा निधी त्याचा भाग असल्याचे बोलले जाते. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत विकासकामे केल्याचा दावा करत पुन्हा मत मागता यावेत यासाठी सत्तेत असलेल्या मंत्र्यांकडून आपापल्या भागातील आमदारांना निधीच्या माध्यमातून बळ देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.