Nanded Hospital Sarkarnama
मराठवाडा

Nanded Hospital News: मोठी बातमी! नांदेड रुग्णालयातील मृत्यू प्रकरणात अधिष्ठातांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

Ganesh Thombare

Nanded News: नांदेड येथील शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी तब्बल 24 रुग्ण दगावल्याची घटना समोर आली होती. या मृतांमध्ये 12 बालकांचा समावेश होता. यामध्ये एका बालकासह आईचाही मृत्यू झाला होता. या महिलेच्या नातेवाइकांनी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

आता त्यांच्या तक्रारीवरून रुग्णालयाचे अधिष्ठाता (डीन) डॉ. एस. आर. वाकोडे आणि बालरोग विभागातील डॉक्टर यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच रुग्णालयाचे अधिष्ठाता आणि बालरोग विभागातील डॉक्टरांनी उपचाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

नांदेड रुग्णालयातील मृत्यू प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयानेही सुमोटो याचिका दाखल करून घेतली आहे. या घटनेवर आज तातडीची सुनावणी पार पडणार आहे. राज्य महाधिवक्ता बीरेंद्र सराफ यांना या प्रकरणावर राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, नांदेड रुग्णालयातील घटनेला राजकीय नेते अर्थात सत्ताधारी जबाबदार असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे, तर दुसरीकडे नांदेड रुग्णालयात अधिष्ठाता यांच्याकडे प्रभारी चार्ज आहे. त्यामुळे औषध खरेदीचे अधिकार त्यांना असतात का ? रुग्णालयात बेड कमी असतील तर अधिष्ठाता काय करणार ?, असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

नांदेड रुग्णालयातील मृत्यूतांडवाने राज्यात खळबळ उडाली. यानंतर शिवसेनेचे (शिंदे गट) खासदार हेमंत पाटील यांनी रुग्णालयाच्या अधिष्ठाता (डीन) यांना शौचालयाची स्वच्छता करायला लावली होती. मात्र, त्यानंतर हेमंत पाटील यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा करण्यात आला, तर आता अधिष्ठात्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited by Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT