Dharshiv Political News : शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या भाषणातून प्रभू श्रीराम आणि बजरंगबलीचा अवमान केल्याचा आरोप, भाजपाने केला आहे. हिंदू देवतांचा अवमान करणाऱ्या ओमराजे व त्यांच्या पक्षाची सत्ता रामभक्तच नष्ट करतील, असा इशारा देत भाजपाने त्यांना घेरले. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा धाराशीव दौरा संपून चोवीस तास उलटत नाही, तोच त्याचे पडसाद जिल्ह्यात उमटतांना दिसत आहे.
ठाकरे यांच्या सभेला जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळाला. ठाकरेंनी धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर आणि विधानसभेसाठी आमदार कैलास पाटील यांची उमेदवारीही स्पष्ट केली. त्यानंतर विरोधक ओमराजे आणि पाटील या जोडीविरुद्ध आक्रमक झाले आहेत.
ओमराजेंनी उद्धव ठाकरे यांच्या सभेत सोयाबीनचे घसरते भाव, तरुणांच्या हाताला काम नसल्याचा उल्लेख करतांना प्रभू श्रीराम आणि बजरंगबलीचाही उल्लेख करत भाजपावर टीका केली होती. आता याच मुद्यावरून भाजपाने(BJP) ठाकरेंच्या शिवसेनेविरोधात रान पेटवले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भाजपाचे धाराशिव लोकसभा अध्यक्ष नितीन काळे, प्रदेश कार्यकारणी सदस्य मिलिंद पाटील यांनी पत्रकार परिषद घेत खासदार ओमराजे निंबाळकर यांचा निषेध केला. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये रामभक्तच त्यांची सत्ता नष्ट करतील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ओमराजे(Omraje Nimbalkar) यांनी संवाद मेळावे घेत राज्य आणि केंद्र सरकारवर तोफ डागली होती. विशेषतः सोयाबीनचे घसरलेले भाव, रोगार आणि शेतमालाच्या नुकसानीची भरपाई मिळत नसल्याचे मुद्दे ओमराजे यांनी प्रकर्षाने मांडले होते.
आपल्या भाषणात त्यांनी मोदींच्या विविध प्रचारसभेतील राम मंदिराचा मुद्दा, मतदानासाठी बजरंगबली की जयच्या दिलेल्या घोषणाचा संदर्भ देत टीका केली होती. जय श्रीराम म्हणा, पण त्याने सोयाबीनचा भाव वाढेल का? जय बजरंग म्हटले तर नोकरी मिळेल का? अशी उपहासात्मक टीका केल्याचा दावा भाजपाने केला आहे. मतांसाठी ओमराजे निंबाळकर यांनी प्रभू श्रीराम व बजरंगबलीचा अवमान केला आहे, असं भाजपाने म्हटलं आहे.
प्रभू श्रीराम यांचा इतिहास जुना असून करोडो भारतीयांच्या भावना त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. अगदी जात-पात व पंथाच्या पलीकडे त्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांच्या आवाजाची नक्कल करून टिंगल टवाळणी करण्याचा प्रकारही ओमराजे यांच्याकडून केला गेल्याचा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला. विशेष म्हणजे रामभक्त असलेल्या वानरांनी प्रभू श्रीराम यांचे नाव लिहिले दगड समुद्रात टाकून राम सेतू बांधला होता. त्यावरून समुद्र पार करून त्यांनी रावणाची लंका जाळली होती, हे त्यांनी विसरू नये.
2019 च्या निवडणुकीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या बळावर ओमराजे खासदार झाले होते. तेच निंबाळकर आज आपल्याला न शोभणारी भाषा बोलत आहेत. त्यांनी तारतम्य बाळगायला हवे होते. त्यांच्या त्या कृतीचा आम्ही जाहीर निषेध करतो, असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना रोखायला हवे होते, असेही भाजपाने म्हटले आहे.
शेतकऱ्याच्या सोयाबीनला चांगला भाव मिळावा, यासाठी आम्हीही प्रयत्न करत आहोत. पण तुरीला 10 हजार 700 रुपये भाव व कांदा निर्यात बंदी उठवली तेव्हा ओमराजे यांनी मोदी सरकारचे कौतुक का केले नाही? असा प्रश्नही भाजपाने उपस्थितीत केला.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.