BJP City President News Chhatrapati Sambhajinagar Sarkarnama
मराठवाडा

BJP News : 'डॉक्टर' कराडांचे इंजेक्शन लागू पडले; भाजपाच्या शहराध्यक्षपदी किशोर शितोळे!

BJP introduces new leadership by appointing Kishor Shitole as the city president of Chhatrapati Sambhajinagar. : छत्रपती संभाजीनगर भाजपा शहराध्यक्ष पदासाठी मोठी चुरस निर्माण झाली होती. स्थानिक नेत्यांनी आपापल्या समर्थकांची नावे पुढे रेटली, परंतु त्यांचे एकमत होत नव्हते.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar News : भाजपाच्या संघटनात्मक निवडींमध्ये नव्या जुन्यांचा समन्वय साधत पक्षाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. मंडळ अध्यक्ष आणि महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील शहर, जिल्हाध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया काही आठवड्यांपूर्वी पार पडली. परंतु मराठवाड्यातील व राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अंतर्गत गटबाजी आणि सहमती होत नसल्याने शहर व जिल्हाध्यक्षांच्या निवडीला ब्रेक लागला होता. त्यात प्रामुख्याने छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी आणि लातूर जिल्ह्याचा समावेश होता.

छत्रपती संभाजीनगर भाजपा (BJP) शहराध्यक्ष पदासाठी मोठी चुरस निर्माण झाली होती. स्थानिक नेत्यांनी आपापल्या समर्थकांची नावे पुढे रेटली, परंतु त्यांचे एकमत होत नव्हते. हा विषय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेला तेव्हा 'आधी तुम्ही एक नाव ठरवा मग माझ्याकडे या', असे म्हणत स्थानिक नेत्यांना माघारी पाठवले होते. विद्यमान शहराध्यक्ष शिरीष बोराळकर, समीर राजूरकर, जालिंदर शेंडगे व दिलीप थोरात या चार नावांची चर्चा गेल्या महिन्याभरापासून सुरू होती.

दरम्यान भाजपाचे खासदार माजी मंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) यांनी शिरीष बोराळकर यांना पुन्हा संधी मिळणार हे लक्षात आल्यानंतर 'पक्षाने आता नव्या चेहऱ्याला संधी द्यावी', अशी परखड भूमिका मांडली होती. यावरून भाजपमधील अंतर्गत राजकारण चांगलेच तापले होते. शिरीष बोराळकर यांच्यासह शहराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या पदाधिकाऱ्यांनीही कराड यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली होती. हा विषय संघटन मंत्र्यांपर्यंत आणि थेट दिल्लीतही गेला होता.

मात्र आज भाजपच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या यादीत किशोर शितोळे या नव्या चेहऱ्याला शहराध्यक्ष पदाची संधी देण्यात आली आहे. एका अर्थाने खासदार भागवत कराड यांची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण केल्याची चर्चा यानिमित्ताने स्थानिक पातळीवर सुरू झाली आहे.

लातूरला कव्हेकर, बसवराज पाटील

याशिवाय मराठवाड्यातील परभणी ग्रामीणच्या अध्यक्षपदी सुरेश भुबंरे, लातूर शहर अध्यक्षपदी अजित पाटील कव्हेकर, लातूर ग्रामीण बसवराज पाटील, नांदेड उत्तर अॅड. किशोर देशमुख नांदेड, दक्षिण संतुकराव हंबर्डे तर बीड भाजपा शहर अध्यक्षपदावर शंकर देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT