Pankaja Munde Retirement Sarkarnama
मराठवाडा

Pankaja Munde Retirement Remark : ‘दोन-चार जणांना रिटायर केल्यावर...’; पंकजा मुंडेंच्या निशाण्यावर कोण?

Pankaja Munde “Retire a Few First” Remark Sparks Political Buzz : भाजपचे दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चा केंद्र असतानाच, मंत्री पंकजा मुंडे यांचे रिटायर्डमेंटवर मोठे विधान केले आहे.

Pradeep Pendhare

Beed Political News : राज्यातील सत्ताधारी राजकारणात सातत्याने चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या भाजप नेत्या तथा मंत्री पंकजा मुंडे यांच्या आणखी एका विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

काही दिवसांपूर्वी केलेल्या रिटायरमेंटच्या विधानानंतर आता त्यांनी स्पष्ट केले आहे की, आपण सध्या रिटायर होणार नाही. उलट, “दोन-चार लोकांना रिटायर केल्यानंतरच आपण रिटायर व्हायचं,” असे सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे.

भाजप (BJP) नेत्या मंत्री पंकजा मुंडे यांच्या या विधानानंतर आता राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू बदलला आहे. मुंडेंच्या निशाण्यावर नेमके कोण आहेत? भाजपमधील त्यांचे राजकीय विरोधक, पक्षातील हितचिंतक की सत्ताधारी आघाडीतील अन्य नेते? या प्रश्नावर तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) केज येथील एका कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी आपल्या रिटायरमेंटबाबत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांवर थेट भाष्य केले. माध्यमांमधून ‘ताई रिटायर्ड होणार’ अशा बातम्या प्रसिद्ध झाल्याचा उल्लेख करत पंकजा मुंडे म्हणाल्या की, आपण रिटायर होणार नाही. “मी चांगली खमकी आहे,” असे सांगत त्यांनी आपल्या राजकीय सक्रियतेबाबत स्पष्ट संदेश दिला.

यानंतर त्यांनी केलेले पुढील विधान अधिक चर्चेत आले. “रिटायर्ड कशामुळे व्हायचे? दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर्ड व्हायचे,” असे पंकजा मुंडे म्हणाल्या. पंकजा मुंडे यांच्या या एका वाक्यामुळे आता राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. त्यांनी उल्लेख केलेले ‘दोन-चार लोक’ नेमके कोण आहेत, याबाबत विविध अंदाज व्यक्त केले जात आहेत.

हे लोक भाजपमधीलच आहेत का? सत्ताधारी मित्रपक्षातील काही नेत्यांकडे त्यांचा रोख आहे का? की हे विधान त्यांच्या राजकीय विरोधकांसाठी होते? पंकजा मुंडे यांनी कोणाचेही नाव घेतलेले नसल्याने या प्रश्नाचे उत्तर अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र त्यांच्या विधानामुळे राजकीय अर्थ काढले जात आहेत.

काही दिवसांपूर्वी बीड-परळी महामार्गावरून प्रवास करताना पंकजा मुंडे यांनी केलेल्या एका वक्तव्यानेही राजकीय चर्चांना सुरुवात झाली होती. तोच रस्ता आणि तीच माणसं पाहिल्यानंतर रिटायरमेंट घ्यावीशी वाटते, अशा आशयाचे विधान त्यांनी केले होते. या वक्तव्याचा राजकीय अर्थ काढत पंकजा मुंडे सक्रिय राजकारणातून बाजूला होणार का? अशी चर्चा सुरू झाली होती.

मात्र केजमधील कार्यक्रमात त्यांनी या चर्चांना थेट उत्तर दिले आहे. त्याचवेळी आपण रिटायर होणार नसल्याचे स्पष्ट करत ‘दोन-चार जणांना रिटायर’ करण्याचे विधान केल्याने, आता चर्चेचा रोख त्यांच्या संभाव्य राजकीय संदेशाकडे वळला आहे.

गोपीनाथ मुंडे यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चेचीही पार्श्वभूमी

दरम्यान, भाजपचे दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या कथित काँग्रेस प्रवेशाच्या तयारीबाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या विधानावरूनही राजकीय वातावरण तापले आहे.

गोपीनाथ मुंडे यांची भाजपमध्ये घुसमट होत होती, अशा आशयाच्या चर्चांवर विविध नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महादेव जानकर आणि राजू शेट्टी यांनीही या विषयावर आपली भूमिका मांडली आहे. दुसरीकडे भाजपकडून या चर्चांना फेटाळण्यात आले आहे.

‘दोन-चार लोक’ म्हणत कोणाकडे इशारा

या सर्व राजकीय पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांच्या रिटायरमेंटच्या वक्तव्याची चर्चा सुरू असतानाच, त्यांनी “दोन-चार लोकांना रिटायर केल्यानंतर...” असे सूचक विधान केल्याने पुन्हा एकदा त्या चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत.

आता पंकजा मुंडे यांच्या या विधानाचा नेमका राजकीय संदर्भ काय आणि त्यांनी ‘दोन-चार लोक’ म्हणत कोणाकडे इशारा केला, याबाबत पुढील काही दिवसांत अधिक स्पष्टता येते का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT