Hingoli Loksabha News
Hingoli Loksabha News  Sarkarnama
मराठवाडा

Hingoli Loksabha News : भाजपचा दावा, शिंदे गटात शांतता, तर ठाकरे गट सक्रिय..

राजेश दारव्‍हेकर

Marathwada : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने जोरदार तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यात केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव यांचा नुकताच दौरा झाला असुन त्यांनी हिंगोली लोकसभेत भाजपासाठी चांगले वातावरण असल्याचा दावा केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Hingoli Loksabha News) महाविकास आघाडीमध्ये जागावाटपासाठी नुकतीच मुंबईच्या टिळक भवनात बैठक झाली. यात लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. तेव्हा ठाकरे गटाकडे असलेल्या या जागेवर काॅंग्रसेनेही दावा सांगितल्याने ठाकरे गट काय भूमिक घेणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

नुकताच केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव यांनी हिंगोली (Hingoli) जिल्हा दौरा केला. त्यांच्याकडे हिंगोली लोकसभा मतदार संघाची जबाबदारी दिली आहे. त्यांनी या संदर्भात आढावा घेत हिंगोली लोकसभेसाठी (Bjp) भाजपाला चांगले वातावरण असल्याचे संकेत दिले. त्यामुळे अनेकांनी दंड थोपटत उमेदवारीसाठी तयारी सुरु केली आहे. तिकडे महाविकास आघाडीत ठाकरे गटाला ही जागा दिला जाणार हे निश्चित असतांना काँग्रसने आमचे संघटन जिल्ह्यात चांगले असल्याचा दावा करत ही जागा आपल्याला मिळावी, अशी मागणी केली आहे.

त्यामुळे भाजपच्या दाव्याने शिंदे गट आणि काॅंग्रेसच्या दाव्याने ठाकरे गट चिंतेत आहे. हेमंत पाटील हे शिवसेनेचे विद्यमान खासदार असल्यामुळे ठाकरे गटाचा या जागेवरचा दावा रास्त आहे. पण (Congress) काॅंग्रेसने त्यात खोडा घातल्यामुळे जिल्ह्यातील आघाडीच्या नेत्यांमध्ये खटके उडत आहेत. शिवसेनेत फुट पडण्याआधी जिथे खासदार होते, त्या सर्व जागा ठाकरे गट लढवणार असल्याने काॅंग्रेसने हिंगोलीच्या जागेवर केलेला दावा न पटण्यासारखा आहे.

विद्यमान खासदार हेमंत पाटील हे शिंदे गटासोबत गेल्याने ठाकरे गट त्यांच्याविरोधात तगडा उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत. पक्ष फुटीनंतर पूर्वी शिवसेना सोडून गेलेले माजी खासदार सुभाष वानखेडे पुन्हा ठाकरे गटात परतले आहेत. त्यांच्याकडे संभाव्य उमेदवार म्हणून पाहिले जात आहे. शिवाय माजीमंत्री जयप्रकाश मुंदडा यांचे नाव देखील चर्चेत आहे. तर काँग्रेसकडून तीनवेळा आमदार राहिलेले भाऊराव पाटील गोरेगावकर हे देखील गुडघ्याला बाशिंग बाधून तयार आहेत.

या शिवाय विधान परिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव यांच्याही नावाचा विचार सुरू असल्याचे सांगितले जाते. मात्र ठाकरे गट हिंगोलीची जागा कदापी सोडणार नाही, असे सांगितले जाते. त्यामुळे काॅंग्रेस इच्छूकांची तयारी वाया जाण्याचीच अधिक शक्यता आहे. तिकडे शिंदे गटाचे पाटील विद्यमान खासदार असताना भाजपकडून जिल्हाध्यक्ष रामराव वडकुते यांची लोकसभा निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. यामुळे ते कामाला लागले आहेत. त्यांचे समर्थक देखील तेच निवडणूक लढविणार असल्याचे सांगत आहेत.

वडकुते यांना लोकसभा प्रमुख पदाची जबाबदारी दिली असल्याने ते तयारीला लागले आहेत. माजी खासदार अॅड. शिवाजी माने, रामदास पाटील सुमठाणकर, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष अॅड. शिवाजी जाधव, श्रीकांत पाटील चंद्रवंशी अशी इच्छुकांची मोठी यादी तयार आहे.

या सर्वांमध्ये प्रशासकीय सेवेचा राजीनामा देत रामदास पाटील सुमठाणकर यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. ते हिंगोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी म्हणून कार्यरत होते. एकंदरित भाजपच्या दाव्याने शिंदे गटात नाराजी, तर काॅग्रेसच्या दाव्याने ठाकरे गटाला टेन्शन अशी परिस्थिती हिंगोली लोकसभा मतदारसंघात पहायला मिळत आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT