Bjp City President Sanjay Kenekar Sarkarnama
मराठवाडा

विधान परिषदेसाठी भाजपकडून संजय केनेकर यांना उमेदवारी निश्चित !

(Bjp City-District President Sanjay kenekar) आगामी औरंगाबाद महापालिका निवडणूक आणि त्यात शिवसेनेशी थेट होणारी लढत पाहता भाजपने डाॅ. भागवत कराड यांच्यानंतर संजय केणेकर यांना बळ देण्याचे ठरवले आहे.

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद ः महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. यासाठी येत्या १० डिसेंबर रोजी मतदान आणि १४ रोजी मतमोजणी होणार आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा सत्ताधारी महाविकास आघाडी व भाजप यांच्यात रस्सीखेच पहायला मिळणार आहे. भाजपकडून या निवडणूकीसाठी औरंगाबाद भाजपचे शहर-जिल्हाध्यक्ष संजय केनेकर यांची उमेदवारी निश्चित झाल्याचे समजते.

संजय केनेकर यांना उमेदवारी द्यावी, अशी शिफारस प्रदेश भाजपातर्फे पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीला करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह पक्षाच्या कोअर कमिटीच्या सदस्यांशी चर्चा करून संजय केनेकर यांचे नाव महाराष्ट्र भाजपतर्फे निश्चित करून शिफारस केली आहे.

भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या अनुमतीने केंद्रीय निवडणूक समितीकडून संजय केनेकर यांची उमेदवारी निश्चित होणार आहे. निवडणूक अर्ज भरण्याची मुदत १६ नोव्हेंबर असून केंद्रीय समितीकडून नाव निश्चित झाल्यावर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत लवकरच अर्ज दाखल करण्यात येणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे.

विधान परिषदेच्या सहा जागांमध्ये मुंबई, कोल्हापूर, धुळे, अकोला, नागपूरचा समावेश आहे. त्यामुळे येत्या काळात महाराष्ट्रात पुन्हा एकदा निवडणुकीचा धुरळा पाहायला मिळणार आहे. आगामी औरंगाबाद महापालिका निवडणूक आणि त्यात शिवसेनेशी थेट होणारी लढत पाहता भाजपने डाॅ. भागवत कराड यांच्यानंतर संजय केणेकर यांना बळ देण्याचे ठरवले आहे.

संजय केणेकर यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दीड-दोन वर्षात भाजपने सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार व जिल्ह्यातील शिवसेनेच्या विरोधात आक्रमक आंदोलनी केली आहेत. शहरात भाजपची ताकद वाढवण्याच्या दृष्टीने त्यांनी केलेल्या प्रयत्नांना एक प्रकारे वरिष्ठांकडून पाठबळ आणि शाबसकी म्हणून त्यांच्या उमेदवारीकडे पाहिले जात आहे.

महाविकास आघाडीचे संख्याबळ पाहता केनेकर यांचा विजय सोपा वाटत नसला तरी एखादा चमत्कार घडून केनेकर आमदार होतात का? हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT