Prakash Ambedkar, Ashok Chavan Sarkarnama
मराठवाडा

Ashok Chavhan : कुणबी मराठ्यांना मतदान करु नका, आंबेडकरांच्या वक्तव्याला अशोक चव्हाणांचं प्रत्युत्तर; म्हणाले, "मराठा…"

Ashok Chavan On Prakash Ambedkar : "राज्यातील राजकारणात आणि समाजात प्रकाश आंबेडकरांसारख्या जबाबदार लोकांनी काळजी घेतली पाहिजे. राज्यातील जातीय सलोखा कायम राहिला पाहिजे, निवडणुका आज आहेत, उद्या त्या संपतील."

Jagdish Patil

Ashok Chavan On Prakash Ambedkar : कुणबी मराठा हे खरे ओबीसी नाहीत त्यामुळे त्यांच्यापासून सावध रहा. विधानसभा निवडणुकीनंतर ओबीसी आरक्षणाला 100% धोका असल्याचं खळबळजनक वक्तव्य करत, आगामी निवडणुकीत कुणबी मराठा उमेदवारांना मतदान करु नका, असं आवाहन करत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.

त्यांच्या या विधानामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. प्रकाश आंबडेकरांच्या याच वक्तव्यावरुन भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी आंबडेकरांवर निशाणा साधला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्यासारख्या जबाबदार नेत्यांनी अशा वक्तव्य करणं दुर्दैवाची बाब असल्याचंही चव्हाण यांनी म्हटलं आहे.

आंबेडकरांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavhan) म्हणाले, "मराठा समाज एकत्रित असून त्यांच्यात कोणताही वाद-विवाद राहिलेला नाही. मात्र अशा प्रकारची वक्तव्य करुन मराठा समाजातील अंतर्गत संबंध खराब करण्याचं काम होत असेल तर ते बरोबर नाही.

राज्यातील राजकारणात आणि समाजात प्रकाश आंबेडकरांसारख्या जबाबदार लोकांनी काळजी घेतली पाहिजे. राज्यातील जातीय सलोखा कायम राहिला पाहिजे, निवडणुका आज आहेत, उद्या त्या संपतील, पण समाजा-समाजात निर्माण होणारी दरी वर्षानुवर्षे तशीच राहते. त्यामुळे समाजात अंतर्गत फूट पाडण्याचं काम कोणीही करू नये."

प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले?

कुणबी मराठा (Maratha) हे खरे ओबीसी नाहीत, त्यामुळे त्यांच्यापासून सावध रहा. सभागृहात 190 कुणबी मराठा समाजाचे आमदार आहेत. तर 11 ओबीसी आमदार आहेत. कुणबी स्वत:ला ओबीसी म्हणत असले तरी ते सभागृहात मराठ्यांसोबत आहे म्हणतो. तो धनगर, माळी वंजारी लिंगायतांबरोबर नसतो. म्हणून त्यांच्यापासून सावध रहा.

तसंच विधानसभा निवडणुकीत कुणबी मराठा उमेदवाराला मतदान करू नका. विधानसभेत ठरावाच्या वेळी कुणबी समाजाची पाटीलकी जागी झाली तर ते आपल्या बाजूने मतदान करणार नाहीत. त्यामुळे यापुढे ओबीसी समाजाने कुणबी सोडून इतर ओबीसी उमेदवाराला मतदान केलं पाहिजे, असं आवाहन त्यांनी वंचितच्या कार्यकर्त्यांना केलं. त्यांच्या या दोन्ही वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT