Beed Politics Sarkarnama
मराठवाडा

Beed Politics : कमळाचं देठ खुडून निवडणूक लढविणार नाही म्हणणारे, भाजप आमदार 'तुतारी'च्या संपर्कात

Datta Deshmukh

Beed News : दोन वेळा भारतीय जनता पक्षाकडून गेवराईतून आमदार राहिलेले लक्ष्मण पवार यांनी भाजप सोडल्यात जमा आहे. कार्यालयातील फलक काढून टाकल्यानंतर आता त्यांच्या पोस्टर, बॅनरवरुनही पक्षाचे चिन्ह गायब झाले आहे. आपण किंवा कुटुंबातील कोणीही विधानसभा निवडणूक लढविणार नाही, म्हणणारे पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या संपर्कात आहेत.

लोकसभा निवडणुकीत या मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना सर्वाधिक मताधिक्क्य भेटल्याने त्यांची पावले या पक्षाकडे वळल्याचे दिसते. सोमवारी मुंबईत राष्ट्रवादीच्या बैठकीवेळी ते या पक्षाच्या एका बड्या नेत्यांसोबतही दिसले.

2014 व 2019 या दोन विधानसभा निवडणुकीत लक्ष्मण पवार गेवराईतून भाजपच्या (BJP) उमेदवारीवर विजयी झाले. लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्या प्रचारात लक्ष्मण पवार फारसे सक्रिय नव्हते. गेवराई मतदार संघातील भाजपच्या प्रचाराची धुरा त्यांच्या भावजय गीता पवार आणि पुतणे शिवराज पवार यांनी सांभाळली. मतमोजणीत या मतदार संघातून भाजपला सर्वाधिक फटका बसला. दरम्यान, निकालाच्या तीन महिन्यानंतर लक्ष्मण पवारांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यपद्धतीवर टिकास्त्र सोडत आपण किंवा कुटुंबातील कोणी निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले.

आजारपणामुळे आपण काही काळ राजकारणापासून दूर असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांनी भाजप श्रेष्ठींसह काही मुद्द्यांवर पंकजा मुंडे यांच्याबद्दलही नाराजी व्यक्त केली. याच दरम्यान त्यांच्या संपर्क कार्यालयातील भाजपचा फलक आणि नेत्यांची फोटोही निघाले आहेत. मागच्या आठवड्यात मतदार संघातील विकास कामांच्या भूमिपुजन व उद्घाटन कार्यक्रमांच्या फलकावरुनही पक्षचिन्ह व नेत्यांची छायाचित्रे गायब आहेत. पण, याच बॅनरवर आता त्यांचे पुतणे शिवराज पवार यांचे छायाचित्र ठळक दिसत आहे.

दरम्यान, पवारांनी भाजप पूर्णपणे सोडल्यात जमा आहे. त्यांची पावले आता तुतारी वाजविणारा माणूस चिन्ह असलेल्या पक्षाकडे वळली आहेत. सोमवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाची बैठकीत माजी मंत्री राजेश टोपे यांच्यासोबत पवार दिसून आले. लोकसभा निवडणुकीत गेवराई मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला सर्वाधिक मताधिक्क्य मिळाले आहे.

यातच 2014 साली 60 हजारांच्यावर फरकाने विजयी झालेले लक्ष्मण पवारांचा 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत केवळ 6792 मतांनी विजय झाला. त्यामुळे बदलत्या वातावरणात विधानसभेला ‘तुतारी वाजविणारा माणूस’ तारू शकतो, असे समीकरण त्यांचे समर्थक मांडत आहेत. तसेच लोकसभा निवडणुकीत मुंडेंना या मतदार संघातून बसलेला फटका पाहता आता मुळ भाजपजणांची नाराजी असल्याने पवार सेफ मार्ग शोधत आहेत. दरम्यान, आपण किंवा परिवारातील कोणीही निवडणुक लढविणार नाही म्हणलेले पवार आता कोणती भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT