Ajeet Gopchade and Ashok Chavan Sarkarnama
मराठवाडा

Ajeet Gopchade and Ashok Chavan : 'पुढे चालून तुम्ही अजगराएवढे मोठेही व्हाल, पण...' ; अशोक चव्हाणांना उद्देशून गोपछडेंचं विधान!

BJP Politics : 'मी ताटावर जेवायला बसलो होतो अन् मला..' असंही गोपछडे यांनी सांगितलं.

Jagdish Pansare

Nanded BJP News : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना भाजपांमध्ये प्रवेश मिळाला, त्यानंतर अवघ्या दोन दिवसांत राज्यसभेवर त्यांची वर्णीही लागली. अर्थात काँग्रेसमधील मोठा नेता, दोनवेळा मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याला पक्षात घेण्यापुर्वी काही कमिटमेंट केल्या जातात, त्यानुसारच सगळे घडले. पण यामुळे मुळच्या भाजपा नेत्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होणे स्वाभाविक आहे. हीच भिती अशोक चव्हाण यांच्यासोबत राज्यसभेवर निवडून गेलेले अजित गोपछडे यांनी जाहीरपणे बोलून दाखवल्याचे दिसत आहे.

गोपछडे यांनी या विधानातून अशोक चव्हाण(Ashok Chavan) यांना अजगरासारखे मोठे व्हाल, अशा शुभेच्छा देतानाच भाजपा एवढ्यात तुम्हाला समजणार नाही, असा टोलाही लगावला. अशोक चव्हाण भाजपामध्ये दाखल झाल्यापासून त्यांनी नांदेड जिल्ह्यात रोज प्रवेश सोहळे घडवून आणण्याचा सपाटा लावला आहे.

मंगळवारी (ता.27) रोजी नांदेड लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीच्या बुथ कार्यकर्त्यांच्या मेळावा पार पडला. मध्यप्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा यांनी यावेळी प्रमुख मार्गदर्शन केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तर खासदार म्हणून राज्यसभेवर गेल्यानंतर गोपछडे(Ajeet Gopchade) यांचे बुथप्रमुखांच्या मेळाव्यातील पहिलेच भाषण होते. या भाषणात त्यांनी जोरदार टोलेबाजी केली. भाजपाची कार्यपद्धती मी हळूहळू समजून घेत आहे, शिकत आहे असे सांगणाऱ्या अशोक चव्हाण यांना खासदार गोपछडे यांनी चांगलेच चिमटे काढले.

गोपछडे म्हणाले 'तुम्ही भाजपाची सिस्टीम हळूहळू समजून घेत आहात, शिकत आहात ही चांगली गोष्ट आहे. पुढे चालून तुम्ही अजगराएवढे मोठेही व्हाल, पण भाजपा समजणे इतके सोपे नाही. या पक्षात कधी काय होईल? काय निर्णय घेतला जाईल हे सांगताच येत नाही. मी ताटावर जेवायला बसलो होतो अन् मला बॅग भरून तयार राहा, असा निरोप आला.'

'बावनकुळे(Chandrasekhar Bawankule) म्हणाले, आता तुझ काही खरं नाही, तुला गाव चलो अभियानात गावोगावी फिरायचे आहे. मी बॅग भरून रेल्वेस्टेशनला जायला निघालो. तेव्हा टीव्हीवर माझे नाव यायला लागले. ही पार्टी भल्याभल्यांना समजली नाही. तेव्हा माझी तुम्हाला विनंती आहे. भाजपा समजण्यासाठी या पक्षाचा विचार, आचार समजावा लागतो.'

याशिवाय 'हा पक्ष हिंदुस्थानच्या परिवाराचा पक्ष आहे, तो समजून घेण्यासाठी चिंतन, मनन करावे लागते. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा बुथ कार्यकर्ता आमच्या पक्षाचा आत्मा आहे. तो समजल्याशिवया भाजपा समजणार नाही. यांच्या जोरावरच आपण देशात पुन्हा भाजपची सत्ता आणून चार सौ पार जाणार आहोत असे खासदार गोपछडे यांनी आपल्या भाषणात ठणकावून सांगितले.' आता गोपछडे यांच्या या विधानाचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.

चार दशकापेक्षा जास्त काळ काँग्रेसमध्ये घालवलेल्या अशोक चव्हाण यांना एकप्रकारे गोपछडे यांनी सावधानतेचा इशाराच दिला आहे. चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशामुळे नांदेड जिल्ह्यातील मुळचे भाजप निष्ठावंत नाराज आहेत. पण पक्षश्रेष्ठींपुढे कुणी जाहीरपणे बोलू शकत नाही. त्या सगळ्यांच्या मनातील व्यथाच एकप्रकारे गोपछडे यांनी जाहीरपणे बुथ कार्यकर्ता मेळाव्यात बोलून दाखवली.

अशोक चव्हाण बाहेरून येऊन पक्षात मोठे होणार याचा अंदाज आल्यामुळेच गोपछडे यांनी त्यांना थेट अजगराएवढे मोठे व्हाल, असा टोला लगावला. पण एवढ्यात तुम्हाला भाजपा समजणार नाही, असा सावधानतेचा इशाराही दिला. एकूणच गोपछडे यांच्या या विधान आणि फटकेबाजीने भाजपामधील निष्ठावंतांचा गट सुखावला आहे. पण अशोक चव्हाण हे काही कच्च्या गुरूचे चेले नाहीत. त्यामुळे गोपछडे यांच्या या विधानाचा समाचार अशोक चव्हाण लवकरच घेतील असे त्यांचे समर्थक सांगत आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT