Nanded congress news
Nanded News : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok chavan) यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नांदेड (Nanded Lok Sabha Constituency 2024) जिल्ह्यातील काँग्रेस खिळखिळी करण्याच्या जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. टप्प्याटप्प्याने आधी काँग्रेसचे आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी, महिला व इतर कार्यकर्त्यांना भाजपमध्ये प्रवेश देत जिल्ह्यातील काँग्रेस उखडून फेकण्याचा डाव चव्हाण यांनी आखला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्यातील काँग्रेस आमदार हे अशोक चव्हाण यांचे टार्गेट असणार आहेत. ही मोहीम फत्ते झाली तर नांदेड जिल्हा पूर्णपणे काँग्रेसमुक्त करण्याचा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना दिलेला शब्द अशोक चव्हाण पूर्ण करण्यात यशस्वी होतील.
नांदेड जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची ताकद वाढवण्यासाठी भाजप नेत्यांनी अशोक चव्हाण यांचा पक्ष प्रवेश करून घेतला. भाजपमध्ये गेल्यानंतर अशोक चव्हाण यांनी मिशन नांदेड भाजपमय करण्याचे ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
त्यांनी आपल्या नांदेडच्या मुक्कामात काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, माजी नगरसेवक, बाजार समितीचे सभापती, संचालक, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी व सदस्य, यांच्या हाती भाजपचा झेंडा व गळ्यात भाजपचा दुप्पटा घालण्याची मोहीम सुरू केली आहे. यानंतर येणाऱ्या काळात काँग्रेसच्या तीन आमदारांना ते गळाला लावण्याची शक्यता आहे.
नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, बाजार समिती, जिल्हा बँक, पंचायत समिती, जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता राहिली आहे.काँग्रेसचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी अशोक चव्हाण यांच्या सारखा तगड्या नेत्याला फोडण्याची भाजपने व्युहरचना केली व ती यशस्वी झाली.
भाजपत अशोक चव्हाण आल्यानंतर त्यांनी पहिल्या टप्प्यात नांदेड शहरातील व भोकर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा प्रवेश सोहळा उरकून घेतला आहे. नांदेड जिल्ह्यात गेल्या विधानसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांच्यासह चार आमदार निवडून आले आहेत.
आमदार माधवराव पाटील जवळगावकर, मोहन आण्णा हंबर्डे, जितेश आंतापूरकर. हे तिन्ही आमदार अशोक चव्हाण यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. सध्या हे तिघेही वेट अँड वॉच भूमिकेत आहेत. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर हे आमदार निर्णय घेऊ शकतात. विधानसभा निवडणुकीपूर्वी या आमदारांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची ताकद वाढवण्यासाठी अशोक चव्हाण येणाऱ्या काळात प्रयत्न करणार आहेत. या तीन आमदारांना गळाला लावण्यासाठी लोकसभा निवडणुकीनंतर प्रयत्न केले जातील, असे बोलले जाते. स्थानिक पातळीवरील राजकीय परिस्थितीमुळे या आमदारांची अडचण आहे. या अडचणींची सोडवणूक व आमदारांचे योग्य प्रकारे पुनर्वसन करण्याची हमी अशोक चव्हाण यांनी दिली तर हे आमदार विधानसभेच्या निवडणुकी आधी भारतीय जनता पक्षात येण्याची शक्यता आहे.
नांदेड जिल्ह्यात नऊ विधानसभा मतदारसंघ आहेत. यातील किनवट, मुखेड, नायगाव या मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. तर नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर हे शिंदे गटात आहेत. कंधार लोहा मतदारसंघात शेकापचे आमदार आहेत. हादगाव विधानसभा मतदारसंघात भाजपची शक्ती कमी आहे. शतप्रतिशत भाजपा करण्यासाठी अशोक चव्हाण यांच्यावर जबाबदारी आली आहे. ही जबाबदारी पूर्णपणे पार पाडायची असेल तर काँग्रेसच्या तीन आमदारांची गरज लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.