Ashok Chavan, Ajit Gopchade Sarkarnama
मराठवाडा

MP Ajit Gopchade News : चर्चा तर होणारच! खासदार गोपछडे भाजप निष्ठावंतांच्या मनातलं बोलले...

Laxmikant Mule

Nanded News : भाजपमध्ये नुकतेच दाखल झालेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना खऱ्या अर्थाने आता भाजप कळणार आहे. चव्हाण यांच्या सोबतच राज्यसभेवर खासदार झालेल्या नांदेडच्या डॉ. अजित गोपछडे (MP Ajit Gopchade News) यांनी बुथ प्रमुखांच्या मेळाव्यात 'अशोक चव्हाण तुम्ही पक्षात अजगरा एवढे मोठे व्हाल', असे मला वाटू लागले आहे, असे म्हणत भाजपमधील निष्ठावंतांच्या मनातील खदखद जाहीरपणे बोलून दाखवली. भविष्यात याचे राजकीय पडसाद नांदेडसह मराठवाड्यातील भाजपमध्येही उमटू शकतात, अशी चर्चा सुरू झाली आहे.

पक्षात काम करणाऱ्या निष्ठावंतांना न्याय मिळतोच असे नाही. त्यांनी फक्त पक्षासाठी काम करणे हेच अपेक्षित असते. काही नेत्यांना कोणत्याही पक्षात प्रवेश केला की पद मिळतेच. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या बाबतीत असेच झाले आहे. त्यांनी भाजपत प्रवेश करताच काही दिवसातच खासदार झाले. पण त्यांच्या आधी पक्षाचे निष्ठेने काम करणाऱ्यांना काय मिळाले? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

या निष्ठावंता़च्या मनातलं खासदार डॉ. गोपछडे यांनी बोलून दाखवत अजूनही पूर्णपणे भाजपमध्ये (BJP) न रुळलेल्या अशोक चव्हाण यांना झटका दिला. निमित्त होते, भाजप बुथ प्रमुखांच्या मेळाव्याचे. या मेळाव्यात गोपछडे चव्हाणांना उद्देशून म्हणाले की, तुम्ही अजगरा एव्हढे मोठे होताल‌. पण तुम्हाला भाजप कळायला वेळ लागेल. त्यांच्या या वक्तव्यावर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी अशोक चव्हाण यांचे राजकीय वर्चस्व लक्षात घेऊन पक्षात प्रवेश दिला. पक्षाने अशोक चव्हाण त्यांच्यावर टाकलेली जबाबदारी पार पाडत असून याची चुणूक गेल्या चार-पाच दिवसांत दाखवून दिली आहे. जिल्ह्यातील चव्हाण समर्थक भाजपत प्रवेश करत आहेत. याची धास्ती जशी काँग्रेसला (Congress) लागली आहे, तशीच भारतीय जनता पक्षातील नेत्यांना, कार्यकर्त्यांनाही लागली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पक्षाची सगळी सुत्र अशोक चव्हाण यांच्याकडे जातात की काय अशी चिंता जुन्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सतावू लागली आहे. नांदेड (Nanded) जिल्ह्यात इतर पक्षातून भाजपत आलेले नेत्यांची संख्या खूप मोठी आहे. तसेच, जिल्ह्यातील प्रस्थापित नेत्यांच्या विरोधात लढा देऊन भाजपचा झेंडा व विचार घरोघरी पोहचविण्याचे नेटाने काम करणारे निष्ठावंतही आहेत. या निष्ठावंतांच्या त्यागातून पक्ष टिकून आहे.

गेल्या दहा वर्षांत भारतीय जनता पक्षाला अच्छे दिन आले आहेत. हे चांगले दिवस येण्यासाठी पक्षाच्या पडत्या काळात काम करणाऱ्या निष्ठावंतांचे योगदान खूप मोठे आहे, हे विसरून कसे चालेल. नांदेड शहरातील बुथ प्रमुखांच्या मेळाव्यात गोपछडे यांना कदाचित हेच लक्षात आणून द्यायचे होते. त्यामुळे अशोक चव्हाण यांच्याविषयी केलेल्या त्यांच्या वक्तव्याची बरीच चर्चा रंगली आहे.

भारतीय जनता पक्षात माजी केंद्रीय राज्यमंत्री सुर्यकांता पाटील, माजी राज्यमंत्री डॉ. माधवराव पाटील किन्हाळकर यांनी दहा वर्षापूर्वी प्रवेश केला आहे. या दोन्ही नेत्यांना अद्याप पक्षाने काहीच दिले नाही. तसेच भाजपचे निष्ठेने काम करणारे प्रा. गणपतराव राऊत, चैतन्य बापू देशमुख, प्रवीण साले, डॉ. धनाजीराव देशमुख, यांच्यासह असंख्य नेते पक्षात आशा बाळगून आहेत. इतर पक्षांतुन येणाऱ्या नेत्यांची संख्या खूप मोठी असल्याने जुने पदाधिकारी व कार्यकर्ते विस्मृतीत गेले आहेत. या सर्वांच्या मनातील भावना डॉ. गोपछडे यांनी बोलून तर दाखवलीच पण अशोक चव्हाण यांनाही ‘थोडं दमानं’ असा सल्लाही त्यांनी दिला. एवढेच नाही तर अशोक चव्हाण पक्षात अजगरा एवढे मोठे झाले तर ते निष्ठावंतांना गिळून टाकतील, असा सूचक संदेशही त्यांनी आपल्या विधानातून दिल्याची चर्चा होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT