Nanded Crime : खासदार अशोक चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील चार आमदारांना उडवून देण्याचा कट रचल्याची धमकी देत व्यापाऱ्याकडे एक लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी अटक केलेल्या आरोपीला न्यायालयाने आणखी एक दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. रविंद्र गौतम रोकडे (वय ३९) असे आरोपीचे नाव आहे. यापूर्वी त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.
तपासासाठी पोलिसांनी वाढीव कोठडीची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने एक दिवसाची न्यायालयीन कोठडी मंजूर केली. दरम्यान, या प्रकरणातील ऑडिओ क्लिप आणि त्यात उल्लेख असलेल्या चार आमदारांच्या नावांबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. महेश कृष्णाजी तुतारे या व्यापाऱ्याची आरोपीशी जुनी ओळख होती. या ओळखीतून आरोपी गेल्या काही दिवसांपासून त्यांना दूरध्वनी करून पैशांची मागणी करीत होता. १४ नोव्हेंबर रोजी त्याने तुतारे यांच्याकडे एक लाख रुपयांची मागणी केली.
पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपीने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि जिल्ह्यातील चार आमदारांना एकाच दिवशी उडवून देण्याचा तीन वर्षांपूर्वी कारेगाव येथे बेत आखल्याचे सांगत धमकी दिली होती. या प्रकरणी तुतारे यांच्या तक्रारीवरून वजीराबाद पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे मुंबईतील भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातून आरोपीला अटक केली होती.
केवळ पैसे उकळण्यासाठी धमकी..
दरम्यान, व्यापाऱ्यावर प्रभाव पाडून त्याच्याकडून पैसे उकळण्याच्या उद्देशाने आरोपीने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह चार आमदारांना जीवे मारण्याच्या कटाचा उल्लेख केला असावा, अशी शक्यता व्यक्त होत आहे. स्वतःचे वजन आणि प्रभाव दाखविण्यासाठी त्याने अशा प्रकारचे वक्तव्य केले असावे, असे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी सांगितले. या प्रकरणात प्रत्यक्ष घातपाताचे नियोजन असल्याचे अद्याप समोर आलेले नाही.
वजीराबाद पोलीस ठाण्याचे निरीक्षक अजित कुंभार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला यापूर्वी एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाली होती. वाढीव पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती; मात्र न्यायालयाने एक दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली. संभाषणात उल्लेख असलेले चार आमदार नेमके कोण, याची अद्याप माहिती मिळालेली नाही. तसेच आरोपीची यापूर्वी कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे त्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.