BJP Political News Sarkarnama
मराठवाडा

BJP Political News : भाजपकडून `विकसित भारत संकल्प यात्रा`, शिंदे-अजित पवार गटाचे काय ?

Jagdish Pansare

Marathwada Politics News : नुकत्याच झालेल्या पाच राज्यातील निवडणुक निकालानंतर देशात `मोदींची गॅरंटी` वाढली आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड राज्यात बहुमतासह सत्ता मिळवल्यानंतर भाजपने आता आपले लक्ष्य आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीवर केंद्रीत केले आहे. (BJP Political News) विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून भाजपने आपल्या लोकसभा प्रचाराला सुरुवात केली आहे.

पण महाराष्ट्रात महायुतीतील शिवसेना (Shivsena) शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे काय? असा प्रश्न निश्चितच पडतो. 2024 मध्ये मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी भाजपने राज्यात अनेक तडजोडी केल्या. महाविकास आघाडीचे सरकार पाडले, शिवसेना, राष्ट्रवादीत फूट पाडली आणि त्यांना सत्तेत सामावून घेतले. या दोन मित्र पक्षांना सोबत घेऊनच येणाऱ्या लोकसभा महायुती म्हणून एकत्रितपणे लढण्याची घोषणाही राज्यातील नेत्यांनी केली.

राज्यातील 48 पैकी किती जागा (BJP) भाजप आणि किती जागा शिवसेना-राष्ट्रवादी (NCP) लढवणार हे अद्याप स्पष्ट नाही. काही दिवसांपुर्वी भाजप 22 आणि शिंदे-अजित पवार गट प्रत्येकी 12 जागा लढवणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. हे सांगतांनाच त्यांनी काही मतदारसंघांमध्ये फेरफार होण्याची शक्यताही वर्तवली होती. या पार्श्वभूमीवर भाजपने राज्यात `विकसित भारत संकल्प यात्रा`, सुरू केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याअंतर्गत गावोगावी जाऊन केंद्र सरकारच्या योजनांची माहिती आणि थेट लाभ देण्यात येत आहे. भाजपने लोकसभा प्रचाराच्या दृष्टीने टाकलेले हे पहिले पाऊल म्हणून या यात्रेकडे पाहिले जाते. दुसरीकडे ज्या शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेऊन भाजपने `मिशन 45` आखले आहे त्या शिंदे आणि अजित पवार गटाची मात्र त्या दृष्टीने काहीच तयारी दिसत नाही. भाजपच्या यात्रेपासून तर हे दोन्ही पक्ष लांब आहेत, की त्यांना लांब ठेवण्यात आले ? हे लवकरच स्पष्ट होईल.

राज्यात सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांनी `शासन आपल्या दारी` च्या माध्यमातून लोकसभेची तयारी सुरू केल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे `विकसित भारत संकल्प यात्रा` हा पुर्णपणे भाजपचा कार्यक्रम असल्याचे स्पष्ट होते. या यात्रेपासून दोन्ही मित्र पक्षांना भाजपने दूर ठेवल्यानंतर त्यांचे उमेदवार भाजपच्या कमळ या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांनाही उधाण आले आहे.

शिंदे गटासोबत असलेले 13 खासदार त्यामुळेच सध्या गॅसवर आहेत. कारण महायुतीत ज्या ठिकाणी शिंदे सेनेचे विद्यमान खासदार आहेत, त्या मतदारसंघातही भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यामुळे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळवले असले तरी या पक्षाच्या खासदारांना भाजपच्या चिन्हावरच निवडणूक लढवावी लागते की काय? अशी शक्यता वर्तवली जात आहे.

दुसरीकडे अजित पवार गटातील एकमेव खासदार सुनील तटकरे आणि इतर इच्छूकांना तरी स्वतःच्या पक्षाच्या चिन्हावर लढता येईल का? की त्यांनाही भाजपच्या कमळाचाच आधार घ्यावा लागेल हे येत्या महिनाभरात स्पष्ट होईल. तुर्तास भाजपकडून लोकसभा विजयाचा `संकल्प रथ` गावोगावी फिरत असला तरी त्यात शिंदे आणि अजित पवार गटाला स्थान नाही एवढे मात्र निश्चित.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT