लक्ष्मीकांत मुळे
Nanded District Assembly Election : महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत बहुतांश विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यातील तीन विद्यमान आमदारांना उमेदवारी जाहीर झाली असून यात मुखेड मधुन डॉ. तुषार राठोड, नायगाव- राजेश पवार, तर किनवट मधुन भिमराव केराम यांचा समावेश आहे. तर भोकर विधानसभा मतदार संघातून श्रीजया चव्हाण यांच्या रुपाने भाजपने पहिल्यांदा नवा चेहरा दिला आहे.
जिल्ह्यात नऊ विधानसभा मतदारसंघ येतात. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे तीन, शिवसेना एक, काँग्रेसचे चार, शेकाप एक असे संख्याबळ होते. (Nanded) गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ होती. राज्याच्या राजकारणात जसे चढ उतार आले तसेच जिल्ह्याच्या राजकारणात आले आहेत. या बदलत्या राजकीय वातावरणाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक होत आहे.
नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे फारशे संघटनात्मक काम नाही. त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला एखादी जागा सुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गट व भारतीय जनता पक्षात जागांची वाटणी होईल.भारतीय जनता पक्षाने बंडखोरी टाळण्यासाठी जिल्ह्यातील तीन विद्यमान आमदारांना उमेदवारी जाहीर केली आहे. या तिन्ही उमेदवारांनी निवडणुकीची तयारी आधीपासूनच केली होती.
मुखेड विधानसभा मतदारसंघाचे डॉ. तुषार राठोड हे गेल्या दहा वर्षापासून मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. या जागेवर शिवसेना शिंदे गटाने दावा केला होता. पण ही जागा भाजपची हक्काची असल्याने शिवसेनेचा दावा फेटाळून लावल्याचे दिसते. (BJP) या जागेवर तुषार राठोड यांना तिसऱ्यांदा निवडून येण्यासाठी खूप मेहेनत करावी लागणार आहे. नायगाव विधानसभा मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे विद्यमान आमदार राजेश पवार यांना उमेदवारी मिळाली आहे.
या मतदारसंघात गेल्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे दिवंगत नेते वसंतराव चव्हाण यांचा पराभव केला होता. गेल्या पाच वर्षांत राजेश पवार यांनी विकास कामे केल्याचा दावा केला जात असला तरी त्यांना पक्षांतर्गत गटबाजीला तोंड द्यावे लागणार आहे. या मतदारसंघात काँग्रेसचा तगडा उमेदवार येणार असल्याने या ठिकाणी चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. किनवट मतदारसंघातुन भिमराव केराम यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.
या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संघटनात्मक काम आहे. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटण्याची शक्यता आहे. भोकर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूकीकडे राज्याचे लक्ष राहणार आहे. या मतदारसंघात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या मतदारसंघात चव्हाण कुटुंबातील तिसऱ्या पिढीतील श्रीजया चव्हाण निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या भोकर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लक्षवेधी होईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.