Jalna News : राज्याचे अल्पसंख्याक विकास व पणन मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी भाजपने केली आहे. महायुतीत सहभागी असतानाही भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात सत्तार यांनी लोकसभेच्या निवडणुकीत काम केल्याचा आरोप भाजपने केला आहे. त्यामुळे भाजपच्या सिल्लोड शहराध्यक्षांनी ही आक्रमक मागणी केली आहे.
याबाबत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना थेट पत्र लिहून भाजपचे सिल्लोडचे शहराध्यक्ष कमलेश कटारिया यांनी ही मागणी केली आहे. सत्तार यांनी लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीचा धर्म पाळला नाही. महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात त्यांनी काम केले, असा आरोप करत सत्तार यांची तातडीने मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी कटारिया यांनी केली आहे.
लोकसभेच्या निवडणुकीत भाजप, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष एकत्रितपणे महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढले. जालना लोकसभा मतदारसंघातून भाजपचे माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनी महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत काँग्रेसचे नेते डॉ. कल्याण काळे यांनी दानवे यांच्या विरोधात निवडणूक लढविली. या निवडणुकीत शिंदे गटाचे मंत्री सत्तार यांनी महायुतीचे उमेदवार दानवे यांना मदत करणे आवश्यक होते. मात्र त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला मदत केल्याची चर्चा आहे.
रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांना लोकसभेच्या निवडणुकीत पराभवाचा धक्का सहन करावा लागल्याने भाजप अॅक्शन मोडवर आली असून त्यांनी महायुतीच्या उमेदवाराला मदत केल्याने त्यांची हकालपट्टी करण्याची मागणी भाजपने केली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर सत्तार यांची काँग्रेसच्या नेत्यांबरोबर जवळीक वाढत आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार कल्याण काळे यांनी सत्तार यांच्या सिल्लोड येथील संपर्क कार्यालयात जाऊन भेट घेतली. तेव्हा सत्तार यांनी काळेंचे अभिनंदन करत डोक्यावर हात ठेवला होता. एवढेच नाही तर काळे माझे चांगले मित्र आहेत, त्यांना मी निवडणुकीत मदत केल्याची जाहीर कबुलीही सत्तार यांनी दिली होती. काँग्रेसचे जालन्याचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी नुकतीच अब्दुल सत्तार यांची त्यांच्या सिल्लोड येथील संपर्क कार्यालयात सदिच्छा भेट घेतली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.