Sanjay Kenekar Sarkarnama
मराठवाडा

Sanjay kenekar : भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस भिडणार? पदवीधर मतदारसंघावरून ठिणगी, संजय केणेकर आक्रमक; म्हणाले, 'युती धर्म किती...'

BJP Vs NCP Graduate Constituency : महायुती म्हणून काही निर्णय घेतला गेला तेव्हा आमच्या मित्रपक्षाने महायुतीचा धर्म किती पाळला? असा टोला संजय केणेकर यांनी राष्ट्रवादीला लगावला.

Jagdish Pansare

Marathvada graduate Constituency : मराठवाडा पदवीधर मतदार संघ हा भाजपचा पारंपारिक गड राहिला आहे. त्यामुळे सहाजिकच आम्ही या जागेवर दावा सांगणार आहोत. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आम्ही महायुतीत मराठवाडा पदवीधरची जागा भाजपासाठी सोडवून घ्या, अशी आग्रही मागणी केली असल्याचे विधान परिषदेचे माजी आमदार संजय केणेकर यांनी स्पष्ट केले.

ही जागा सुरुवातीपासून भाजपकडे असल्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा देखील जागा आपल्यालाच मिळावी अशी आहे. राहिला प्रश्न महायुतीमध्ये जागा कोणाला सोडायची? याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महायुतीचा धर्म सांगत जागेवर दावा केला असला तरी जेव्हा जेव्हा राज्यात महायुती म्हणून काही निर्णय घेतला गेला तेव्हा आमच्या मित्रपक्षाने महायुतीचा धर्म किती पाळला? याचे आत्मपरीक्षण करावे, असा टोलाही संजय केनेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांना नाव न घेता लगावला.

दोन लाख 90 हजार पदवीधर मतदारांची संख्या आहे. भाजपने या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी गेल्या वर्षभरापासून सुरू केली आहे. आम्ही दोन लाख मतदारांची नोंदणी केल्याचा दावाही संजय केणेकर यांनी केला.

मराठवाडा पदवीधर मतदार संघासाठी मतदार नोंदणी प्रमुख म्हणून संजय केणेकर यांच्यावर पक्षाने वर्षभरापूर्वी जबाबदारी सोपवली होती. 2008 पूर्वी मराठवाडा पदवीधर मतदारसंघावर भाजपची मजबूत पकड होती. मात्र गेल्या तीन टर्म पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सतीश चव्हाण हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.

पदवीधर मतदार संघाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सतीश चव्हाण यांनी पक्षाने आपल्याला निवडणुकीची तयारी करण्याचे आदेश दिल्याचे सांगत मतदारांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. तर दुसरीकडे संजय केणेकर यांच्यासह भाजपच्या काही इच्छुकांनी पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारीसाठी फिल्डिंग लावली आहे.

संजय केणेकर यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी गणरायाचे दर्शन घेत भेट घेतली होती. या भेटीदरम्यानच केनेकर यांनी पदवीधर मतदार संघाच्या उमेदवारीसाठी देवाभाऊंना साकडे घातल्याची चर्चा आहे.

विधान परिषदेवर केवळ 11 महिन्यांचा कालावधी आमदार म्हणून मिळाल्यानंतर संजय केनेकर हे पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत. मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या निमित्ताने केनेकर यांना ही संधी मिळणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

भाजपा कार्यकर्त्यांमध्ये चीड

2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांची महायुती होती. असे असताना मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघात भाजपच्या प्रशांत बंब यांच्या विरोधात दंड थोपटले होते.

गंगापूर मधून निवडणूक लढवण्यासाठी सतीश चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून उमेदवारीसाठी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला होता. भाजपची या निवडणुकीत सरशी झाली असली तरी सतीश चव्हाण यांच्या या कुरापतीची आठवण यानिमित्ताने संजय केणेकर यांनी माध्यमांशी बोलताना करून दिली.

...तर मैत्रीपूर्ण लढत

मतदारसंघ महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे याची आठवण करून देणाऱ्या मित्रपक्षाने तेव्हा महायुतीचा धर्म किती पाळला होता, याचे आत्मचिंतन करावे असे म्हणत केणेकर यांनी आमदार सतीश चव्हाण यांच्यावर निशाणा साधला. 2008 पूर्वी भाजपकडे असलेला मराठवाडा पदवीधर मतदारसंघ राष्ट्रवादीने गेल्या 18 वर्षापासून खेचून घेतल्याचे शल्य भाजपच्या राज्यातील नेतृत्वाला देखील आहे. त्यामुळे आता चालून आलेली संधी ते महायुतीचा धर्म पाळण्यासाठी सोडणार का? हा खरा प्रश्न आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण हे गेल्या तीन टर्म पासून या मतदारसंघाचे सलग प्रतिनिधित्व करत असल्यामुळे सहाजिकच या जागेवर त्यांचा प्रबळ दावा असणार आहे.

अशावेळी महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांमध्येच उमेदवारीवरून रस्सीखेच होणार हे अटळ आहे. अशा परिस्थितीत मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव देखील पुढे येऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT