Chhatrapati Sambhajinagar: भाजपमध्ये घराणेशाहीला थारा नाही, सर्वसामान्य कार्यकर्ता पुढे येतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून पक्षाचे दिल्लीतील वरिष्ठ नेते वारंवार सांगतात, तर दुसरीकडे काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात घराणेशाही असल्याचे सांगत भाजप म्हणजे 'पार्टी विथ डिफरन्स', असे सांगत स्वत:ची पाठ थोपटून घेतली जाते. मात्र, नुकत्याच छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर येथील जिल्हा कार्यकारिणीच्या निवडीवरून भाजपचा हा बुरखा फाटला आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी मुलगा व बहिणीला पुढे आणल्याचे समोर आले आहे. भाजपकडून गेल्या काही दिवसांपासून 'पार्टी विथ डिफरन्स' असे म्हटले जात असले तरी अनेक भाजप नेत्यांनी घराणेशाहीचा वारसा जपल्याचे समोर आले आहे.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे हे आमदार आहेत, तर दानवे यांचा भाऊ भास्कर दानवे जालना जिल्हा उपाध्यक्ष आणि जालना विधानसभा मतदारसंघ प्रमुख आहेत. दानवे यांची मुलगी आशा पांडे ही जिल्हा परिषद सदस्य होती. तिला जिल्हा परिषद अध्यक्ष करण्यासाठी दानवे यांनी मोठी ताकद लावली. मात्र, बबनराव लोणीकर यांनी दानवेंचे मनसुबे उधळून लावले होते.
कन्नड विधानसभेत रावसाहेब दानवे यांची दुसरी मुलगी संजना जाधव यांनाही राजकीय शक्ती देतात. दानवेंचे जवळपास सगळेच जवळचे नातेवाईक सत्तेत विविध पदांवर आहेत. माजी मंत्री बबनराव लोणीकर यांचे चिरंजीव राहुल लोणीकर हे भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष आहेत.
तर दुसरीकडे दोन दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरची जिल्हा कार्यकारिणी नियुक्त करण्यात आली. त्यामध्ये केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांनी मुलगा हर्षवर्धन कराड यांना शहर व जिल्हा सरचिटणीस केले, तर भगिनी उज्ज्वला दहिफळे यांना उपाध्यक्ष म्हणून पुढे आणले आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणीत चिरंजीव संकेतला संधी दिली असून, त्यांचीही सरचिटणीस पदावर वर्णी लागली आहे. त्यासोबतच मराठवाड्यातील माजी मंत्री पंकजा मुंडे व त्यांच्या भागिनी डॉ. प्रीतम मुंडे या दोघींही या पदावर आहेत. त्यामुळे भाजपमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात घराणेशाही असताना केवळ 'पार्टी विथ डिफरन्स'च्या वावड्या उठविल्या जात असल्याने ही केवळ गर्जनाच ठरत आहे.
Edited by Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.