EKnath shinde, Devendra Fadnavis Sarkarnama
मराठवाडा

BJP News : इच्छुकांच्या उड्या पाहून भाजप नेत्यांना स्वबळाचे डोहाळे; शिंदेंच्या शिवसेनेला धूळ चारण्याची रणनीती...

BJP strategy municipal election : शिवसेनेत पडलेली फूट आणि त्यानंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर कुरघोडी करण्यात यश मिळाल्यानंतर भाजपने आता महापालिकेसाठी स्वबळाचा नारा दिला आहे.

Jagdish Pansare

Municipal Corporation News : नगरपरिषद, नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होण्याआधीच महापालिका निवडणुकीची तयारी राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. नेहमीप्रमाणे यातही भाजपने आघाडी घेतली असून छत्रपती संभाजीनगर महापालिकेसाठी पक्षाच्या वतीने संभाव्य उमेदवारांसाठी अर्ज विक्री सुरू करण्यात आली. यासाठी भावी नगरसेवकांनी अक्षरशः रांगा लावून पावणे सहाशेहून अधिक अर्ज खरेदी केले. भाजपकडे असलेली ही गर्दी पाहता महापालिकेत युतीच्या कुबड्या झुगारून पक्षाकडून स्वबळाचा नारा दिला जाण्याची अधिक शक्यता दिसते.

छत्रपती संभाजीनगर महापालिकेत गेल्या पंचवीस वर्षापासून शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांची कायम सत्ता राहिली आहे. प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेणाऱ्या शिवसेनेला महापालिकेत कायम मोठा भाऊ होण्याचा मान मिळाला तर भाजपला त्यांच्या मागे फरफटत जावे लागले, अशी स्थानिक पदाधिकारी आणि नेत्यांची भावना बनली आहे. शिवसेनेत पडलेली फूट आणि त्यानंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर कुरघोडी करण्यात यश मिळाल्यानंतर भाजपने आता महापालिकेसाठी स्वबळाचा नारा दिला आहे.

नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीमध्ये हा प्रयोग यशस्वी झाला तर भाजप महापालिका आणि जिल्हा परिषदेतही स्वबळाचा पॅटर्न राबवणार अशी चर्चा आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिका भाजपकडून निवडणूक लढवण्यास इच्छुकांची संख्या शेकडोमध्ये असल्याचे अर्ज खरेदीसाठी पडलेल्या उड्यांवरून दिसून आले. एका प्रभागातून किमान चार इच्छुक असावेत, असे ठरवण्यात आले होते. त्याहीपेक्षा अधिकचा प्रतिसाद मिळाल्याचे भाजपकडून सांगण्यात येत आहे.

तास न तास रांगा लावून उमेदवारी अर्ज खरेदी केल्यानंतर भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. ज्या प्रभागांमध्ये महिला आरक्षण जाहीर झाले आहे, अशा प्रभागांमध्ये उमेदवारी अर्ज खरेदी करण्यासाठी इच्छुक महिला उमेदवारांची पती आले होते. मात्र, त्यांना माघारी पाठवत ज्यांना निवडणूक लढवायची आहे त्यांनीच अर्ज खरेदीसाठी यावे, असा दंडक स्थानिक निवडणूक समितीतील सदस्यांनी घालून दिला. त्यामुळे अनेक इच्छुकांनी आपापल्या सौभाग्यवतींना घेऊन पुन्हा अर्ज खरेदीसाठी रांगा लावल्याचे दिसून आले.

एकूणच हा उत्साह पाहता भाजप महापालिकेत स्वबळासाठी दंड थोपटणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. छत्रपती संभाजीनगर शहराचा आणि महापालिकेतील सत्तेचा विचार केला तर येथे स्थानिक प्रश्नांपेक्षा प्रखर हिंदुत्व आणि ते स्वीकारून पुढे जाणाऱ्या पक्षालाच मतदारांची पसंती मिळाली आहे. शिवसेना- भाजप या दोन पक्षांच्या हातीच महापालिकेची सत्ता कायम राहिली. आता पुन्हा सत्तेतील या दोन पक्षांमध्येच स्थानिक पातळीवर संघर्ष असेल असे चित्र आहे.

ता. 6 डिसेंबर रोजी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शौर्य दिन साजरा करत महाआरती करण्यात आली. तर भारतीय जनता पक्षाच्या वतीने ही स्वतंत्रपणे महाआरती करत आपली पुढील दिशा कशी असेल? असा सूचक संदेश देण्याचा प्रयत्न झाला. हिंदुत्वाशिवाय संभाजीनगर महापालिकेत रखडलेली पाणीपुरवठा योजना हा मुद्दा सत्ताधारी शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांसाठी कळीचा ठरणार आहे. भाजप मात्र पाणीपुरवठा योजना आम्ही आणल्याचा दावा करत त्याचे श्रेय घेऊनच महापालिका निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे.

याशिवाय पाईपमधून गॅस पुरवठा करणारी योजना आणत भाजपच शहराचा विकास करू शकतो हे दाखवण्याचा प्रयत्न स्थानिक नेते करत आहेत. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अंतर्गत बंडाळी आणि लाथाळ्या सुरू असल्याने सध्या तरी या पक्षाची महापालिका निवडणूक तयारी फारशी वेग घेताना दिसत नाहीये.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT